मानखुर्द – शिवाजीनगर मतदार संघातील ओबीसी आरक्षण सोडतीला तीव्र विरोध
आरक्षण सोडतीचा पुरुष उमेदवारांना फटका
अरुणकुमार करंदीकर पनवेल शहर प्रतिनिधी मो. क्र.7715918136
पनवेल : मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढल्यानंतर संपूर्ण मुंबईतील 227 प्रभागांचे चित्र स्पष्ट झाले आहे. तर ह्या सोडतीत मानखुर्द शिवाजीनगर मतदार संघात चार जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. ह्या मतदार संघात इच्छुक पुरुष उमेदवारांचे प्रभाग आरक्षित झाले आहेतच, पण आजुबाजुचेही प्रभाग आरक्षित झाले असल्यामुळे पुरुष उमेदवारांना प्रभागच नाहीत. अशी एकूण परिस्थिती आहे. यामुळे सदर आरक्षण सोडती बाबत नागरिकांनी व इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त करुन त्यास हरकत घेतली आहे.
मुंबईतील सर्वच विधानसभा मतदारसंघ निहाय विचार केल्यास प्रत्येक मतदारसंघात साधारणत : सहा ते सात प्रभाग येतात. तथापि याच मतदार संघात चार प्रभाग ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे एससी एसटी व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना प्रभागच उरलेले नाहीत. म्हणुनच बाजूच्या मतदार संघासाठी प्रयत्न करण्याचा पर्यायही ह्या ठिकाणी उरलेला नाही. सदर ठिकाणी चारही मतदारसंघांत सर्वच पक्षांकडे ओबीसी उमेदवार सुध्दा नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे येथील मतदार संघात पुर्णपणे नवीन चेहरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वाधिक अल्पसंख्याक मतदार असलेल्या एम पुर्व विभागातील मानखुर्द शिवाजीनगर येथील नागरिकांच्या काही संस्था व संघटनांनी ओबीसी आरक्षण सोडतीवर तीव्र आक्षेप घेऊन विरोध केला आहे. त्याच कारणाने इथल्या ओबीसी आरक्षण सोडतीमुळे वाद निर्माण झाला आहे. त्याच अनुषंगाने मानखुर्द शिवाजीनगर मतदार संघातील एससी एसटी व खुल्या प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष व्याप्त आहे. कारण की, सदर प्रभागातील होतकरू कार्यकर्त्यांनी मनापासुन राजकीय व सामाजिक कार्य केलेले आहे. 2017 सालातील मागच्या निवडणुकीनंतर पुढे येणाऱ्या निवडणुकीसाठी चातकासारखी वाट पाहणा-या कार्यकर्त्यांच्या मनसुब्यावर ओबीसी आरक्षण सोडतीमुळे पाणी पडले आहे.
मानखुर्द शिवाजीनगर मधील 135 , 136 , 137 ,138 ह्या चार ओबीसी आरक्षित मतदार संघातील लोकसंख्या पाहता येथिल आरक्षण लोकशाही विरोधी आणि विसंगत असल्याचे येथील नागरिकांनी म्हटले आहे. ह्या सोडतीमुळे महापालिका निवडणुक लढवण्याची इच्छा बाळगणाऱ्या अनेकांना झटका बसला आहे. मागच्या निवडणुकीत सुध्दा ह्या मतदार संघात चार प्रभाग ओबीसी आरक्षित झाले होते. मग आता सलग त्याच चार प्रभागात पुन्हा दुसऱ्यांदा ओबीसी आरक्षण कसे काय असुन शकते ? असा प्रश्न करुन येथिल नागरिकांनी व इच्छुक उमेदवारांनी ओबीसी आरक्षण सोडतीवर हरकत घेतली आहे.
यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त भुषण गगरानी यांनी 14 ते 20 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आरक्षण सोडतीच्या प्रारुपावर हरकती व सूचना सादर करण्यास सांगितले आहे. सदर हरकती व सूचनांवर काळजीपूर्वक विचार केल्यानंतर आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल असे सांगितले आहे. हरकती व सूचना संबंधित माहिती विभाग कार्यालयात सुचना फलकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना व इच्छुक उमेदवारांना त्यांच्या संबंधित विभाग कार्यालयात भेट देऊन अथवा महापालिकेच्या संकेत स्थळावर जाऊन सुचना व हरकती नोंदविता येणार आहेत.