हत्या प्रकरणात 4 आरोपींना अटक

त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी.
मो 9096817953
नागपूर :- नंदनवन परिसरात रविवारी रात्री वैयक्तिक वैमनस्यातून विकेश जाधव नावाच्या व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. पडोळे नगर चौकात घडलेल्या या घटनेत चार गुन्हेगारांनी त्यांची हत्या केल्याची माहिती आहे.या चारही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. निखिल वासनिक, भोला इंगळे, प्रभाकर चौधरी आणि आकाश नागरीकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
विकेश जाधव आणि निखिल वासनिक यांच्यात बरेच दिवसांपासून वाद सुरु होता. या दोघांविरुद्ध यापूर्वीही खून, हल्ला, दरोडा असे अनेक गुन्हे दाखल आहेत. जुलै 2021 मध्ये निखिलला एमपीडीए कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती, परंतु तुरुंगातून सुटल्यानंतरही तो गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय होता.
काही दिवसांपूर्वी हिवरीनगर परिसरात विकेश आणि निखिल यांच्यात भांडण झाले होते, त्याबाबत नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रारही करण्यात आली होती. तेव्हापासून निखिल बदला घेण्याच्या विचारात होता. पडोळे नगर झोपडपट्टीत रविवारी पुन्हा दोघांमध्ये वाद पेटला. निखिल आणि त्याच्या साथीदारांनी विकेशची हत्या केल्याची माहिती आहे.आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर नंदनवन पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.








