Home latest News ग्रुप ग्रामपंचायत गाणी कोंढेचा आदर्श.. श्रमदानातून उभारला वनराई बंधारा तर गावात अवतरले...

ग्रुप ग्रामपंचायत गाणी कोंढेचा आदर्श.. श्रमदानातून उभारला वनराई बंधारा तर गावात अवतरले ‘डिजिटल युग

76

ग्रुप ग्रामपंचायत गाणी कोंढेचा आदर्श..
श्रमदानातून उभारला वनराई बंधारा तर गावात अवतरले ‘डिजिटल युग

म्हसळा: संतोष उद्धरकर.

म्हसळा:महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना ला कोकणातील गावांमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. याचाच एक उत्कृष्ट नमुना श्रीवर्धन तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गाणी कोंढे येथे पाहायला मिळाला. या अभियानाच्या माध्यमातून केवळ शासकीय योजना राबवल्या गेल्या नाहीत, तर ‘पारदर्शक कारभार’, ‘लोकाभिमुख प्रशासन’ आणि ‘शाश्वत विकास’ या अभियानाच्या त्रिसूत्रीवर आधारित विविध उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित या कार्यक्रमात प्रशासकीय, सामाजिक आणि कृषी अशा सर्वच आघाड्यांवर ‘समृद्ध पंचायत’ संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पारदर्शक आणि स्मार्ट प्रशासन, गतिमान प्रशासन, शाश्वत विकास आणि जलसंवर्धन, कृषी सक्षमीकरण आणि आर्थिक उन्नती, सर्व समावेशक सामाजिक सुरक्षा, ग्रामपंचायत निराधार योजना या प्रकारे योजना राबविण्यात पुढाकार घेऊन या क्रांतिकारी उपक्रमाचे साक्षीदार म्हणुन पंचायत समिती गट विकास अधिकारी माधव जाधव, कृषी विसार अधिकारी राधा कराळे, स्वदेश फाऊंडेशनचे नाथा कटारे, तसेच गावचे युवा सरपंच आदित्य कासरूंग, ग्राम विकास अधिकारी अभिजीत माने, उपस्थित होते, तसेच या कार्यक्रमाचे नियोजन सुदाम शिगवण, अनंत शिगवण, रामचंद्र शिगवण, ग्रामपंचायत सदस्य निखिल कदम यांच्या सह अनेक ग्रामस्थ, महिलांनी उपस्थिती दर्शविली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची उद्दीष्ठ्ये गाणी गावाने ज्या तन्मयतेने साध्य केले आहे ते ईतर ग्रामपंचायती साठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे मान्यवरांनी मत व्यक्त केले.