Home latest News अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत डॉ. प्रशांत नाईक यांची बिनविरोध निवड
अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत डॉ. प्रशांत नाईक यांची बिनविरोध निवड
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत शेकाप–काँग्रेस आघाडीला मोठा दिलासा मिळाला असून प्रभाग २ब मधील शेकाप उमेदवार डॉ.प्रशांत नाईक हे बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपचे संतोष साळुंखे यांनी गुरुवारी (२० नोव्हेंबर) आपले नामनिर्देशन मागे घेतल्यानंतर नाईक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. यानंतर शेकाप कार्यकर्त्यांनी शेतकरी भवन येथे जल्लोष साजरा करत डाॅ. नाईक यांचे अभिनंदन केले.प्रशांत नाईक हे माजी नगराध्यक्ष आहेत. त्यांच्या बिनविरोध येण्याने आघाडीमध्ये आणखी उत्साह निर्माण झाला आहे.
२ डिसेंबरला मतदान होणार असून आघाडी व भाजप–शिंदे गट युती यांच्यात मुख्य लढत होणार आहे. बिनविरोध विजयानंतर आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षया नाईक, ॲड. मानसी म्हात्रे आणि कार्यकर्त्यांनी प्रशांत नाईक यांचे अभिनंदन केले. त्यांच्या बिनविरोध निवडून आल्याचे वृत्त वाऱ्या सारखे पसरले आणि त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला.शेतकरी भवन येथे प्रत्यक्ष भेटून आणि मोबाईल वर संपर्क साधून त्याच्या हितचिंतकांनी,कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. अलिबाग नगरपालिकेच्या सत्तेत गेली 30 वर्षाहून अधिक काळ शेकापचे वर्चस्व राहिले आहे. स्वतः प्रशांत नाईक हे नगराध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक निवडणुका शेकापने जिंकल्या आहेत. ही निवडणूक देखील त्यांच्याच नेतृत्वाखाली लढली जात आहे. या वेळी त्यांची मुलगी अक्षया नाईक ही थेट नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहे. प्रशांत नाईक यांच्या बिनविरोध निवडून येण्याने आघाडीतील सर्वच उमेदवारांना ऊर्जा मिळाली आहे. हा आपल्यासाठी चांगला कौल असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.