Home latest News चारापाण्यासाठी शोधात मेंढपाळ रायगड मध्ये दाखल

चारापाण्यासाठी शोधात मेंढपाळ रायगड मध्ये दाखल

94

चारापाण्यासाठी शोधात मेंढपाळ रायगड मध्ये दाखल

कुटुंबाचे अर्थचक्र चालवण्यासाठी काही महिन्यांचा मुक्काम

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर असणाऱ्या दुष्काळी भागातून मेंढपाळांचा मोठा समुदाय आपल्या हजारो मेंढ्या घेऊन चारा आणि पाण्याच्या शोधात रायगड जिल्ह्यात दाखल झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हे मेंढपाळ कुटुंबाचे अर्थचक्र चालवण्यासाठी काही महिन्यांसाठी ते रायगड परिसरात तळ ठोकणार असून, हिवाळ्यानंतर पुन्हा आपल्या मूळ गावी परत जातील.

पुणे आणि जेजुरी परिसरातील दुष्काळग्रस्त भागातून दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला मोठ्या संख्येने मेंढपाळ रायगड जिल्ह्यात येतात. यंदा पावसाने उशिरापर्यंत हजेरी लावली असली तरी, या मेंढपाळ बांधवांनी आपला पारंपरिक येण्याचा क्रम कायम ठेवला आहे. सध्या हे मेंढपाळ रायगड जिल्ह्यातील अलिबाग,पेण,मुरुड, उरण व खारेपाठ भागातील गावांच्या परिसरात मुक्काम करत आहेत. शेतजमिनी आणि माळरानांवर मुबलक चारा व पाण्याची उपलब्धता असल्याने दरवर्षी हा भाग त्यांची तात्पुरती कर्मभूमी बनतो.

हा धनगरवाडा पुढील काही महिने रायगड जिल्ह्यात आपले पारंपरिक जीवन जगत, निसर्गाच्या साहाय्याने कुटुंबाचा गाडा चालवणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील अनेक परिसरात अद्यापही पावसाचा जोर असल्याने त्यांना सुरक्षित निवारा शोधावा लागतोय. उदरनिर्वाहासाठी स्थलांतर मेंढपाळ कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्थलांतर हा एकमेव मार्ग आहे. त्यांची उपजीविका केवळ मेंढ्यांवर अवलंबून नसून, ते स्थानिक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाचे ठरतात. शेतकरी आपल्या शेतात मेंढ्या बसविण्यासाठी मेंढपाळांना काही धान्य आणि रोख रक्कम देत असत. मेंढ्यांनी शेतात मुक्काम केल्याने पिकासाठी नैसर्गिक खत (शेणखत) मिळते आणि जमीन कसदार होते. यामुळे शेतकरी व मेंढपाळ यांचे एक पारंपरिक आणि परस्परपूरक संबंध आजही या भागात टिकून आहे. यंदा मात्र पाऊस उशिरापर्यंत झाल्यामुळे, ज्या शेतात पिके कापून झाली आहेत, तिथेही पाणी साचलेले असल्याने मेंढ्यांना बसविण्यासाठी अडचण येत आहे. एका मेंढपाळाने सांगितले की, घाटमाथ्यावर चारा-पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी इकडे यावं लागतं. या भागात आमच्या मेंढ्यांना भरपूर चारा आणि पाणी मिळतं, शिवाय शेतात मेंढ्या बसविल्याने शेतकऱ्यांकडून धान्य व पैसेही मिळतात.

घाटमाथ्यावर चारा-पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी इकडे यावं लागतं. या भागात आमच्या मेंढ्यांना भरपूर चारा आणि पाणी मिळतं, शिवाय शेतात मेंढ्या बसविल्याने शेतकऱ्यांकडून धान्य व पैसेही मिळतात.

-मेंढपाळ