Home latest News पन्हळघर खुर्द झोरेवाडीचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार

पन्हळघर खुर्द झोरेवाडीचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार

53

दोन दिवसांत योजना कार्यान्वित करण्याचे आश्वासन; ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त

प्रतिनिधी – राम सिताराम भोस्तेकर

माणगाव: तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पन्हळघर खुर्द येथील झोरेवाडीमध्ये ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. गावातील सोलार पॅनलवर चालणारा पंप अचानक बंद पडल्यामुळे नळपाणी पुरवठा योजना पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.

ही गंभीर बाब शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच नामदार भरत गोगावले यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, महाड विधानसभा समन्वयक निलेश केसरकर, जिल्हा परिषद सदस्य दिनेश हरवंडकर, पंचायत समिती सभापती विलास शिंदे, पंचायत समिती सदस्य रविंद्र टेंबे, माणगाव तालुका संपर्क प्रमुख प्रताप घोसाळकर,विभाग प्रमुख समाधान करकरे, सरपंच हारिदास शेडगे, उपसरपंच जाधव, रोहित रातवडकर, उपविभाग प्रमुख संजय जाधव, माजी उपसरपंच राजन शिंदे,समाधान कानू करकरे तसेच ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रत्यक्ष झोरेवाडीमध्ये जाऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.

पाणीपुरवठा योजना बंद पडल्यामुळे महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. समस्येची गंभीरता लक्षात घेऊन संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्यात आला असून, बंद पडलेली योजना तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत पाणीपुरवठा योजना प्रभावीपणे सुरू करण्यात येईल, असे आश्वासन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत शिवसेनेचे आभार मानले. “कोणतीही समस्या असो, शिवसैनिक तत्काळ धावून येतात. नामदार भरत गोगावले यांच्या माध्यमातून झोरेवाडीतील अनेक विकासकामे पूर्ण झाली असून, गावाच्या प्रश्नांकडे सातत्याने लक्ष दिले जाते,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

दरम्यान, दुर्गम भागातील पाणीपुरवठा योजना सुरळीत राहण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.