Home latest News रायगड जिल्हा मुख्यालयाच्या अलिबाग नगरपरिषदेत काटे की टक्कर

रायगड जिल्हा मुख्यालयाच्या अलिबाग नगरपरिषदेत काटे की टक्कर

79

रायगड जिल्हा मुख्यालयाच्या अलिबाग नगरपरिषदेत काटे की टक्कर

शेकापच्या अक्षया नाईक आणि भाजपच्या तनुजा पेरेकर यांच्यात सरळ लढत

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्‍ह्याचे मुख्‍यालय असलेल्‍या अलिबाग नगर परिषदेच्‍या निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून अर्ज कलेल्या कविता ठाकूर ह्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्‍ला अशी ओळख असलेल्‍या अलिबागमध्‍ये शेकाप – कॉंग्रेस आघाडी विरूदध भाजप शिवसेना युती असा सामना रंगणार हे आता स्‍पष्‍ट झाले आहे. अलिबागकर यावेळी कुणाला कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अलिबाग नगरपालिकेवर 40 वर्षे शेतकरी कामगार पक्षाची सत्‍ता आहे. शेकाप विरोधात सर्व पक्ष अशी लढत या नगरपालिकेत आतापर्यंत पहायला मिळत होती. त्‍यावेळी विरोधकांचे चार – पाच नगरसेवक निवडून येत असत. मात्र मागील 2016 मध्‍ये झालेल्‍या निवडणूकीत प्रशांत नाईक हे शेकापचे थेट नगराध्‍यक्ष पदाचे उमेदवार होते. त्‍यावेळी कॉंग्रेस शेकाप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत झाली होती. दोन्‍ही उमेदवारांचा पाडाव करीत प्रशांत नाईक थेट नगराध्‍यक्षपदी मोठया फरकाने विजयी झालेच शिवाय शेकापचे नगरसेवक पदाचे सर्व 17 उमेदवार निवडून आले.

यावेळी शेकाप कॉंग्रेस आघाडीमध्‍ये शेकाप नगराध्‍यक्षपदासह नगरसेवक पदाच्‍या 18 जागा लढवत आहे. तर कॉंग्रेस 2 जागा लढवत आहे. यावेळी आघाडीने नगराध्‍यक्षपदासह बहुतांश नवीन चेहरे दिले आहेत. यावेळी अलिबागचे नगराध्‍यक्षपद सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव आहे. माजी नगराध्‍यक्ष प्रशांत नाईक यांच्‍या कन्‍या अक्षया या नगराध्‍यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. सुशिक्षित नवीन चेहरा ही शेकापच्‍या दृष्‍टीने जमेची बाजू म्‍हणता येईल.

दुसरीकडे जिल्‍हयात नाही किमान अलिबागमध्‍ये तरी महायुती होईल अशी शक्‍यता वाटत असतानाच राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने महायुतीपासून फारकत घेतली आहे. महायुतीच्‍या नगराध्‍यक्षपदाच्‍या उमेदवार म्‍हणून ज्‍यांच्‍याकडे पाहिले जात होते त्‍यांनी माघार घेतली आणि अखेरच्‍या क्षणी नगराध्‍यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु आता शेवटच्या क्षणी कविता ठाकूर यांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे. आता प्रवीण ठाकूर आणि कविता ठाकूर कुणाच्या मागे उभे राहतात हे पहावं लागणार आहे. त्‍यामुळे अलिबागच्‍या निवडणूकीत नवा टिवस्‍ट निर्माण झाला आहे. महायुतीची वाटचाल सुरूवातीपासूनच धडपडत चालली होती. अनेक प्रभागात उमेदवार शोधताना दम निघाला होता. त्‍यातच नगराध्‍यक्ष पदाच्‍या शर्यतीत असलेल्‍या उमेदवारांनी वेगवेगळी कारणं देत माघार घेतली. त्‍यामुळे ठाकरेंच्‍या शिवसेनेतील नाराज माजी नगरसेविका तनुजा पेरेकर यांना भाजपमध्‍ये घेवून उमेदवारीची माळ त्‍यांच्‍या गळ्यात घालण्‍यात आली. कौटुंबिक नातेसंबंधंमुळे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी या निवडणूकीत अपेक्षित रस दाखवलेला दिसत नाही. तरीही शिवसेना इथं पाच जागांवर निवडणूक लढवते आहे.

शेकाप एकही जागा द्यायला तयार नसल्‍याने शिवसेना ठाकरे गटाने आपले दोन उमेदवार उभे केले आहेत. प्रभाग क्रमांक 4 मधून संदीप पालकर आणि श्‍वेता पालकर हे पतीपत्‍नी निवडणूकीच्‍या रिंगणात आहेत. नगराध्‍यक्ष पदाच्‍या निवडणूकीत शरद पवारांच्‍या राष्‍ट्रवादी कॉंग्रेसनेही आपला उमेदवार उभा केला असला तरी त्‍यांची ताकद दखलपात्र नाही.

नगराध्‍यक्षपदाच्‍या निवडणूकीत दोनच उमेदवार उभे आहेत. मुख्‍य लढत शेकाप कॉंग्रेस आघाडीच्‍या अक्षया नाईक आणि भाजप शिवसेना युतीच्‍या तनुजा पेरेकर यांच्‍यातच आहे. तर नगरसेवक पदाच्‍या निवडणूकीत …….. उमेदवार रिंगणात असून त्‍यासाठी सरळ लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक 2 ब मधून भाजप उमेदवाराने माघार घेतल्‍याने शेकापचे प्रशांत नाईक बिनविरोध विजयी झाले आहेत. त्‍यामुळे शेकापसाठी हा शुभशकुन मानला जात आहे.

अलिबाग नगरपालिकेची निवडणूक दोन्‍ही गटांकडून विकासाच्‍या मुद्यावर लढवली जाणार आहे. अलिबागला स्‍मार्ट सिटी बनवायची आहे असं अक्षया नाईक सांगतात तर अलिबागला अजूनही मुलभूत नागरी सुविधाच अपुऱ्या असल्‍याचा दावा विरोधकांनी केलाय. अलिबाग शहरातील भुयारी गटार योजना, डंपिंग ग्राऊंड, भाजीमार्केट या बरोबरच वाहतूक कोंडी अशा प्रमुख मुद्यांवर विरोधी पक्षाने बोट ठेवले आहे. भाजपने यावेळी तीन मुस्‍लीम उमेदवारांसह अठरापगड जातीला प्रतिनिधीत्‍व देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.

दुसरीकडे शेकापची गेली 40 वर्षे अलिबागवर असलेली सत्‍ता आणि प्रशांत नाईक यांची प्रतिमा, पक्ष संघटन आणि कार्यकर्त्‍यांचे जाळे यावर शेकापची मदार असणार आहे. दोन्‍ही गटांनी आपापला प्रचार सुरू केला आहे. पुढील काही दिवसात प्रचाराची राळ उठेल आणि अलिबागकर यावेळी सत्‍ता कुणाला द्यायची याचा निर्णय घेणार आहेत.