संविधान जागर अभियाना अंतर्गत बार्टीच्या वतीने संविधानिक सापशिडी हा आगळावेगळा उपक्रम संपन्न
अंबाजोगाई प्रतिनिधी: संविधान जागर अभियानांतर्गत अंबाजोगाई येथील श्री. मुकुंदराज माध्यमिक विद्यालय येथे बार्टीच्या वतीने संविधानिक सापशिडी हा आगळावेगळा व उपयुक्त उपक्रम उत्साहात संपन्न झाला. संविधान जागर अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांचे हक्क यांची माहिती खेळाच्या माध्यमातून सुलभतेने मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे – सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था – यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक न्याय मंत्री श्री. संजय शिरसाट, बार्टीचे महासंचालक श्री. सुनील वारे, सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, बार्टीचे विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड, सहाय्यक आयुक्त, बीड श्री. प्रदीप भोगले, तसेच समतादूत प्रकल्प अधिकारी श्री. योगेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. अंबाजोगाई तालुक्याचे समतादूत श्री. व्यंकटेश जोशी यांनी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी संविधानिक सापशिडीचा खेळ घेण्यात आला. यातून विद्यार्थ्यांना संविधानाचे मूलभूत घटक आणि नागरिक म्हणून असलेली कर्तव्ये–हक्क यांची माहिती रोचक पद्धतीने मिळाली.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अमर मारोतीराव मुळे, सहशिक्षक सोमवंशी के.एस., पर्यवेक्षक अंबाड एस.जी., इंगळे एन.के., शितोळे एम.डी., गंगणे व्हि. तसेच अन्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपक्रमात इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सहभागी विद्यार्थी, शिक्षक मुख्याध्यापकांचे आभार बार्टीचे समतादूत व्यंकटेश जोशी यांनी केले.
संविधानाबद्दलची जाणीव आणि जागरूकता विद्यार्थ्यांमध्ये आनंदी वातावरणात वाढीस लागावी, या उद्देशाने घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.









