कुठे मिळेल ? ते काय असत ? आणि कसं दिसत ?
९९ % लोकांना जगण्याचं स्वातंत्र्य देणारे संविधान माहित नाही. ते कां ?
✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838
लेख : –
मी स्टेशनरीच्या दुकानात उभा होतो . इतक्यात एक माझ्याच वयाचे गृहस्थ तिथं आले. आणि दुकानदाराला विचारू लागले , ओ, भारताची राज्य घटना किंवा भारताचं संविधान नावाचं पुस्तक आहे का ? (रोहा शहरातल एक स्टेशनरी दुकान.) दुकानदार म्हणाला नाही.
नाही म्हणाल्या बरोबर ते गृहस्थ जाऊ लागले .मी सुध्दा लगेच निघालो, त्यांना गाठलं ,आणि विचारल,दादा तुम्ही संपूर्ण रोहा पालथा घातलात तरी एकाही दुकानात भारताच संविधान मिळणार नाही. ते गृहस्थ म्हणाले होय वो.
मी सगळ्या दुकानात विचारत विचारत आलो. कुठच नाही मिळालं. मी त्यांना म्हंटल दादा , खरं तर प्रत्येक बुकस्टाॕलवर हे पुस्तक असायलाच पाहिजे होतं.
पण नाही हेच वास्तव आहे .आपल्या देशातल्या नागरीकांना, हक्क अधिकार आणि निर्धास्त जगण्याचं स्वातंत्र्य देणारं संविधान माहीत नाही .ते काय असत? , कसं दिसत? , हे सुध्दा या सत्तर वर्षात नव्याण्णव टक्के लोकांनी पाहिलेलं नाही .बाजारात सर्रास वेगवेगळ्या धर्माचे धर्म ग्रंथ खुले आम विकले जातात .पण या सर्व ग्रंथांपेक्षा लाख पटीनं श्रेष्ठ असलेल संविधान बाजारात सहज कुठचं मिळत नाही .का ? हा प्रश्नच कुणाला पडत नाही .जाणीवपूर्वक हा प्रश्नच कुणाला पडू दिला गेला नाही .दर वर्षी सव्वीस जानेवारी साजरी होते .पण या दिनाला प्रजासत्ताक दिन संबोधलं गेलं .संविधान दिन नाही म्हटलं . जगानं मान्य केलं की भारताच संविधान हे सर्वश्रेष्ट संविधान आहे .परंतु भारतातील मनुवादी प्रवृत्तीनं ते सामान्य माणसापर्यंत येऊच दिल नाही .का ? कारण….
1) संविधानाची ताकद त्यांना माहीत आहे . संविधान समाजात रुजलं तर संविधानान दिलेल्या समता, स्वातंत्र्य, मैत्री, न्यायाची अंमलबजावणी करावी लागेल. विषमतेची फळं कडू होतील .
2)संविधान लिहीलं डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांनी . एका अस्पृश्य समाजतल्या माणसानं. ही या देशातील मनुवादी लोकांची पोटदुखी आहे .
ज्यांच्या साठी 340 कलम लिहील ते OBC सुध्दा संविधान जाणून घेण्याच्या मानसिकतेचे नाहीत आणि या देशातील तमाम स्त्री वर्ग जो मनुवादी शोषणातून, पिळवणूकीतून संविधानामूळ मूक्त झाला त्या स्त्री वर्गानंही संविधानाचा द्वेश करणं सोडलेल नाही . हे वास्तव आहे .मनुस्मृतीत लिहिलंय *ढोर गँवार पशु नरनारी सब है ताडन के अधिकारी*. अस्पृश्य, अशिक्षित आणि सर्व स्त्रिया शोषण करण्यासाठीच आहेत असं या मनुस्मृतीनं म्हटलंय . मात्र संविधानातील 340 कलमान OBC समाजाचं जीवन नटलंय. असं असताना यांना शोषण करणा-या मनुस्मृतीचा मोह आहे .
आज सत्तर वर्ष होऊन गेली . या देशान देशात संविधान राबवलंच नाही .हे सांविधानिक पध्दतीनं निवडून येतात आणि कारभार मनुस्मृतीच्या विकृत प्रवृत्तीनं करतात .
म्हणूनच बाबासाहेब म्हणाले होते, *मी लिहीलेलं संविधान कितीही चांगल असल तरी ते राबवणारे लोक चांगले नसले तर या संविधानाचा काहीच उपयोग होणार नाही.* आजची अराजकता पाहून वाटतय आजवर या देशाला संविधान चालवणारे *लायक* लोक भेटलेच नाहीत .
हे चित्र बदललं पाहिजे . संविधान जागृती झाली पाहिजे. संविधान वाचवल पाहिजे .ते वाचल तर देश वाचेल ,देश वाचला तर देशातील प्रत्येकजण वाचेल.शत्रू पण वाचेल मित्र पण वाचेल .
हे संविधान शाळेत पहिली पासूनच शिकवलं पाहिजे.
ते गृहस्थ शांतपणे ऐकत राहीले . ते उभे आहेत ऐकत आहेत हे माझ्या लक्षातच नाही राहील .ते म्हणाले , होय बरोबर बोलताय. मी यु ट्युबवर एक भाषण ऐकलं आणि बाजारात संविधान मिळतंय का ते शोधलं . पण कुणाकडचं नाही हा महान ग्रंथ. ते मला विचारू लागले, दादा *कुठे मिळेल ?*
मी त्यांना सांगितलं,
दादा हा महान ग्रंथ बाजारात कुठंच मिळत नाही. कुणीही वाचावा, कुणीही विकावा, कुणीही विकत घ्यावा असं असताना हा महान ग्रंथ बाजारात विकत मिळत नाही .हा महान ग्रंथ महिन्याचे तीस दिवस, वर्षाचे बारा महिने दोनच ठिकाणी विकत मिळेल.
१) दादर चैत्य भूमी.
२) नागपूर दीक्षा भूमी.
तस वाचायला हवं असेल तर माझ्या घरी आहे . घेऊन जा आणि वाचून परत द्या . ते म्हणाले नाही . मला स्वतःला हवय . वाचायला ही आणि घरात प्रदर्शनी भागी ठेवायलाही.
मी गेल्या रविवारी 26 जानेवारीला धम्म संस्कार शाळेत मुलांना विचारलं, किती जणांनी संविधान हा ग्रंथ हातात घेऊन पाहिलाय ? एकाही मुलान हात वर केला नाही. मला खूप वाईट वाटलं .कारण बा भीमाचे अनुयायी म्हणून आम्ही कमी पडलोय .हा देश मनुवादी मानसिकतेचा आहे हे मान्य आहे परंतु हे मान्य करताना आपण बा भिमाचे अनुयायी असून आमच्या घरात संविधान नाही.आपण जयभीम बोलायच्याही लायकीचे नाही . आम्हा बौध्दांच्या घरात किमान दोन ग्रंथ पाहिजेच पाहिजे . पहिला *तथागत बुध्द आणि त्यांचा धम्म.* आणि दुसरा *भारतीय संविधान.* हे दोन्ही ग्रंथ सिंम्बाॕल आॕफ द नाॕलेज ही पदवी मिळालेल्या आपल्या बापानं लिहिलेत याचा आपल्याला किती गर्व पाहिजे ! वाचता येणा-यांच्याच नव्हे तर वाचता न येणा-यांच्या घरातही पाहिजे .का ? कारण कुणीही असा बौध्द सापडणार नाही की तो म्हणेल मी हे ग्रंथच पाहिले नाहीत .घरात असले की वाचलेही जातील .
डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांनी जितका सखोल अभ्यास केला तितका कुणीच केला नसेल आजवर. डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्द धम्माचे मुख्य दोन यान हिनयान आणि महायान, यांचा आणि यांच्या अनेक शाखांचा सखोल अभ्यास करून आपल्या सर्वांना कळेल असा धम्म ग्रंथ लिहिला . आणि तो आपल्या घरात नसणं आणि असून न वाचणं . या पेक्षा बेईमानी ती कोणती ? जगाने मान्य केलेला सर्वश्रेष्ठ ग्रंथ , *भारतीय संविधान* आपल्या घरात नसणं . आपल्या मुलांना त्याची ओळख नसणं हे सुध्दा लांच्छनास्पद कृत्य आहे . हे मान्य केलच पाहिजे . त्याला जबाबदार आपण आहोत. अजून वेळ गेलेली नाही . संविधान जागृती आणि बा भिमाच्या विश्वासातला नितीवान समाज घडवण्यासाठी आपल्याला कार्य केलं पाहिजे .कर्तव्य भावनेनं काम केलंं पाहिजे . गावागावात हे काम चालू झालं पाहिजे .
वर्षातून एकदा वक्ते बोलाऊन केलेलं प्रबोधन टिकत नाही .अभ्यासू प्रवृत्तीनं धम्म आणि संविधान शिकवलं पाहिजे. शिकलं पाहिजे . तरच संविधान वाचवणारे आणि नीती नं देश संविधानावर चालवणारे लोक तयार होतील .
त्या साठी गावागावातून प्रतिसाद मिळाला पाहिजे हीच अपेक्षा. उशीर तर झालेलाच आहे .अधिक उशीर नको.
आम्ही तयार आहोत आपण तयार व्हा .