Home latest News मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा…पण मराठी माणसंच एकमेकांच्या विरोधात उभी राहतात तेंव्हा

मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा…पण मराठी माणसंच एकमेकांच्या विरोधात उभी राहतात तेंव्हा

87

आज महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या मनात हा विचार आला पाहिजे की हे असेच सूडबुद्धीचे राजकारण चालू राहिले तर पुढे आपले आपल्या मुलांचे काय ?

 

राजेंद्र सच्चिदानंद गोलतकर
उत्तर मध्य मुंबई उपजिल्हा अध्यक्ष
महाराष्ट्र संरक्षण संघटना:

मी महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्र माझा आहे.असे सर्व महाराष्ट्रातील मराठी माणूस छाती फुगवून सांगतो. पण महाराष्ट्रावर अन्याय, अत्याचार करणाऱ्या वर तुटून पडत नाही.आज कित्येक अमराठी राजकारणी,मराठी नेत्यांना रोज कोणत्या न कोणत्या कारणा वरून आव्हान करतात.त्यामुळे सर्व सामान्य मराठी माणसांची तळपायाची आग मस्तकात जाते.तसेच येथील मराठी नेते रोज एकमेकांच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप करत आहेत.याचा फायदा अमराठी राजकारणी घेतात.या लोकांनी मराठी माणसांची जणू चेष्टाच मांडली आहे.मराठी नेते जाती वरून खालच्या दर्जाचे राजकारण करत आहे.हे कुठे तरी थांबले पाहिजे.हे असेच चालू राहिले तर मराठी माणूस एकमेकांच्या उरावर बसून नष्ट होईल.
आज आपण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतो.संपूर्ण मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतो. आपण त्यांना महापुरुष मानतो. महाराजांच्या नावाने बऱ्याच लोकांनी आपली संपत्ती जमा केली.कित्येकांना निवडणूकांच्या वेळी महाराजांची आठवण येते.कित्येक जन निवडून ही येतात.पुढे यांचे कार्य काय?

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करते वेळी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र येऊन.हिदवी स्वराज्याची निर्मिती केली.म्हणजेच सर्व जाती, धर्मातील लोकांना एकत्र येऊन स्वराज्य उभे केले.महाराजांनी कोणत्याच जातीतील लोकांवर अन्याय केला नाही आणि कोणालाच करायला दिला नाही. महाराजांच्या मते जो अन्याय करतो आणि जो अन्याय सहन करतो,ते दोघे आरोपी होते आणि आहेत.जो अन्याय करतो तो ५० टक्के गुन्हेगार असतो आणि जो सहन करतो १०० टक्के गुन्हेगार असतो. वरील वाक्य हे सध्याच्या मराठी लोकांना लागु होते.किती आणि कोणाचा अन्याय आपण सहन करायचा आणि का ? म्हणून मराठी माणसा जागा हो !

आज महाराष्ट्रातील सर्व मराठी लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे.जात,पात, धर्म, प्रांत, विभाग, लहान,मोठा,हा माझा नेता,माझा नेता जे बोलेल ते मी करेन हे सर्व खोटे आहे.हे बाजूला ठेऊन आपण एकत्र येऊ. महाराजांनी सर्व जातीतील लोकांचा सन्मान केला. महाराजांनी ज्या ज्या मोहिमा आखल्या त्या त्या मोहिमांचे नेतृत्व अठरा पगड जातीतील लोकांना दिल्या.तसेच प्रत्येक मोहिमांचे नेतृत्व ही वेग वेगळ्या मावळ्यांना दिले त्यामुळे प्रत्येक मावळ्यांमध्ये एकमेकांबदल आदर राहिला. तसेच आपसामध्ये मतभेद राहिले नाही. या मुळेच महाराज्यांच्या शब्दाला मान देणारे वेळेला प्राण ही अर्पण करणारे मावळे महाराजांना मिळाले.

आज महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या मनात हा विचार आला पाहिजे की हे असेच सूडबुद्धीचे राजकारण चालू राहिले तर पुढे आपले आपल्या मुलांचे काय ? आज महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी मराठी माणसांना पदोपदी हक्कासाठी संघर्ष करावा लागतो आहे.सत्ता कोणाचीही असो.सर्वांनीच मराठी माणसाला वाऱ्यावर सोडले आहे जर मराठी राज्यकर्त्यांना मराठी माणसांची गरज नाही.तर आपण ही त्यांच्या मागे का लागावे.जर मराठी नेते आपल्याच अस्तित्वाचा विचार करत असतील तर आपण सर्व सामान्य मराठी लोकांनी त्यांचा विचार का करावा ? म्हणूनच मराठी माणसा एक हो.

गेली पाच,सहा वर्षे महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी महाराष्ट्र संरक्षण संघटना संघर्ष करत आहे.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी संघर्ष करत आहे.मराठी माणसांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवीत आहे. महाराष्ट्र सुरक्षित रहावा म्हणून संघर्ष करत आहे. महाराष्ट्रातील मराठी शाळा,तसेच संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातूनच असावे ही आमची मागणी आहे. महाराष्ट्रात येणारे स्थलांतरितांवर निर्बंध आणणारा कायदा झाला पाहिजे ही आमची आग्रहाची मागणी आहे. हे आणि असे अनेक प्रश्नांची उत्तरे या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला मिळवायची आहेत.म्हणून मराठी माणसा महाराष्ट्र संरक्षण संघटनेत सामील हो!