आदिवासींचे आरक्षण धनगर अथवा अन्य जातीच्या समाजाला देऊ नका, एकलव्य आदिवासी युवा संघटनेची मागणी

प्रकाश नाईक
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी
मो.📲 9511655877
नंदुरबार :- दि 21 सप्टेंबर 2023 रोजी एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने मा.तहसीलदार साहेब तळोदा यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात असे म्हटले आहे की, आदिवासींचे आरक्षण हे संविधानिक हक्क असून त्यामध्ये कोणत्याही धनगर अथवा अन्य जातीची घुसखोरी करू नये, धनगर समाजाचा आदिवासी आरक्षणात समावेश करण्यात यावा म्हणून आपणाकडे व शासनस्तरावर वारंवार मागणी केली जात असुन ती बेकायदेशीर आहेत.
धनगर व धनगड या दोन भिन्न जाती आहेत. त्यामुळे धनगरांना अनुसूचित जमातीत आरक्षण देता येणार नाही, असा स्पष्ट सविस्तर अहवाल टिस (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस) ने अहवाल महाराष्ट्र शासनाकडे दिलेला आहे. असे असताना धनगरांना अनुसूचित जमातीत आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करणे अत्यंत चुकीचे आहे, तसेच आदिवासींची संस्कृती परंपरा नितीमूल्ये राहणीमान जीवनशैली भौगोलिक परिस्थिती तसेच विशिष्ट भुप्रदेशात वास्तव्यास असलेला व स्वतंत्र बोलीभाषा असलेला समाज आहे. आदिवासींची संस्कृती ही धनगर समाजाशी आजिबात मिळती जुळती नाहीत. त्यामुळे आदिवासी समाजाची रितीरिवाज, रूढी,परंपरा, खानपान,भाषा, जीवनशैली, स्वतंत्र आहेत. आदिवासी समाज व धनगर समाज हे दोन वेगवेगळे समाज आहेत.
आदिवासी समाजाचा व धनगर समाजाचा कुठल्याही बाबतीत ताळमेळ बसत नाही.आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने ७ टक्के आरक्षण अद्याप मिळालेलेच नाही कारण, आधीच आदिवासी समाजात गैर आदिवासींची, बोगस जातपडताळणी चे दाखले घेत आदिवासी मध्ये घुसखोरी झालेली आहेत. खोट्या व बनावट जात प्रमाणपत्रांआधारे बोगस आदिवासींनी आदिवासींच्या लाखो नोकऱ्या हडप बडकावल्या आहेत.
अशा एकूण ७५ हजार बोगस कर्मचाऱ्यांना सेवासंरक्षण देण्याचा निर्णय २९ नोव्हेंबर २०२२ ला शासनाने घेतला आहे.
गैर आदिवासींनी अनेक क्षेत्रात आदिवासी आरक्षणाचा गैरफायदा घेतलेला आहे व घेत आहेत. त्यामुळे आदिवासी समाजाच्या होणार्या प्रगतीस अडथळा निर्माण होत आहे. आदिवासींच्या आरक्षणात धनगर समाजाचा समावेश करु नेये अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यांची नोंद घेण्यात यावी. असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतांना यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अँड. गणपत पाडवी, युवा अध्यक्ष विकास ठाकरे, तालुका सचिव फत्तेसिंग, शंकर,आदी उपस्थित होते.








