8 वर्षाच्या चिमुकल्याला बिबट्याने नेले उचलून

8 वर्षाच्या चिमुकल्याला बिबट्याने नेले उचलून

8 वर्षाच्या चिमुकल्याला बिबट्याने नेले उचलून

• पद्मापूर परिसरात झुडपी जंगलात आढळला मृतदेह
• शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात जमावाचा तणाव

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 21 सप्टेंबर
महानगराला लागून असलेल्या दुर्गापूर परिसरातील सिनाळा गावातील एका 8 वर्षीय चिमुकल्या मुलाला शुक्रवारी सायंकाळी घराशेजारी प्रसाधनगृहास गेला असता, बिबट्याने उचलून नेले. त्यामुळे दुर्गापूर परिसरात एकच खळबळ उडाली. रात्री वनविभाग व पोलिस विभागाने शोधमोहिम राबवली. पण, चिमुकल्याचा थांगपत्ता लागला नाही. शनिवार, 21 सप्टेंबर रोजी शोधमोहिम राबवली असता, पद्मापूर सब एरिया कार्यालयाच्या मागील झुडपी जंगल परिसरात मुलाचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळला.
वनविभागाच्या चमुने पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रूग्णालयात मृतदेह आणला. संतप्त जमावाने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी रोष व्यक्त केला. त्यामुळे रूग्णालय परिसरात तणावपूर्ण शांतता कायम आहे.
दुर्गापूर परिसरात वेकोलिच्या कोळसा खाणी आहेत. याच परिसराला लागून ऊर्जानगर आहे. या ठिकाणी महाऔष्णिक वीज केंद्र आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल तसेच दुर्गापूरच्या परिसराला लागून घनदाट जंगल आहे. वाघ, बिबट यांचे वास्तव्य या परिसरात नेहमीच आढळून येते. शनिवारी सायंकाळी दुर्गापूर येथील एक चिमुकला घराशेजारी प्रसाधनगृहास गेला. त्याला बिबट्याने उचलून नेले. एका वाहन चालकाच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्याने आरडाओरड केली. त्यामुळे ही बाब नागरिकांच्या लक्षात आली.
घटनेची महिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळाकडे गर्दी केली. याबाबतची पोलिस व वन विभागाला माहिती दिली. अधिकार्‍यांनी घटनास्थळी येऊन शोधमोहीम सुरू केली. परंतु, रात्र झाल्याने मुलाचा पत्ता लागलेला नव्हता. विशेष म्हणजे, या परिसरात बिबट्यांचा वावर आहे. यापूर्वी तीन ते चार मुलांना दुर्गापूर येथूनच बिबट्याने उचलून नेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या घटनेमुळे दुर्गापूर परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here