Home latest News महावितरण कंपनीच्या कामाबाबत नाराजी

महावितरण कंपनीच्या कामाबाबत नाराजी

137

महावितरण कंपनीच्या कामाबाबत नाराजी

झाडांच्या फांद्या, झुडपे काढण्यास महावितरण उदासीन

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- महावितरण कंपनीने वाढलेली झाडे, फाद्यांची कटाई पावसाळ्यापूर्वी केल्याचा दावा महावितरण कंपनीकडून केला जात आहे. मात्र, हा दावा फोल ठरला आहे. जून महिना उजाडूनही जिल्ह्यातील वीज तारा, खांबांना झुडपांचा विळखा आहे. हे काम अपूर्णच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या कामाबाबत नाराजीचे सूर उमटत आहेत.

अतिववृष्टीमुळे झाडांची पडझड होण्याची भिती कायमच असते. त्यात वीज तारा तुटण्याची तसेच वीज खांब पडण्याचा धोका असते. त्याचा फटका वीज ग्राहकांना पावसाळ्यात बसतो. वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रश्न कायमच भेडसावत असतो. वीज तारा तुटणे, विद्युत खांब पडणे हा प्रकार घडत असल्याने अनेकवेळा ग्राहकांना अंधारात राहण्याची वेळ येते. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होतो. हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीसह वाढलेल्या झाडांच्या फांद्या, विद्युत पोलावर झुडपांचा विळखा काढण्याचे काम करण्याच्या सूचना महावितरण कंपनीकडून देण्यात आल्या. त्यानुसार विद्युत तारा, खराब विद्युत खांब नव्याने बसविणे, उंच झालेल्या झाडांच्या फांद्या तोडणे अशा अनेक प्रकारची कामे कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली.

यावेळी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आला. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने दमदार एन्ट्री मारली आहे. मान्सून सुरु होण्यासाठी बोटावर मोजण्या इतकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. तरीदेखील महावितरण कंपनीचे देखभाल दुरुस्तीचे काम अपूर्ण असल्याचे समोर आले आहे. अलिबाग – रोहा, अलिबाग रेवस, अलिबाग रेवदंडा मार्गावरील अनेक भागातील रस्त्यांवरील झाडांची कटाई न केल्याने विजेच्या तारा तुटण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अनेक गावांतील विद्युत खांबावरील झुडपांचा विळखा काढण्यास महावितरण कंपनी उदासीन ठरली आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुन्हा वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.