भिवंडीत मुसळधार पाऊस, मात्र भिवंडी महानगरपालिका सतर्क, कोणतीही हानी नाही.
अभिजित आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076
भिवंडी शहरात दि. 18.08.2025 रोजी 147 मी.मी. व 19.08.2025 रोजी दुपारी 03:00 पर्यंत 126 मी.मी. इतका पाऊस शहरामध्ये पडला. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने तसेच आज सकाळी 10:00 वाजता ही भरतीची वेळ असल्याने प्रशासन याबाबत सतर्क होते. मा. प्रशासक तथा आयुक्त श्री. अनमोल सागर यांनी सर्व अभियंते, प्रभाग समिती 1 ते 5 अधिकारी, बिट निरीक्षक, आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांना सतर्क राहुन सकाळपासुन संभाव्य ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मा. अतिरीक्त आयुक्त श्री. विठ्ठल डाके यांचे पर्यवेक्षणाखाली सर्व अधिकारी/कर्मचारी हे शहरामध्ये आपत्कालीन परिस्थतीचा सामना करण्यासाठी सज्ज होते.
जर पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली तर, नागरीकांना तातडीने स्थलांतरीत करण्याकरिता भिवंडी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये व्यस्था केली आहे. शहरामध्ये काकूबाई चाळ, हंडी कंपाऊंड, आजमी नगर, संगमपाडा, म्हाडा कॉलनी येथे पाणी साचल्याने प्रशासनाने तेथील नागरीकांचा स्थलांतरीत होण्याच्या सुचना केल्या. मात्र नागरीक हे स्थलांतरीत होत नसल्याने प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करुन नागरीकांची दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. हंडी कंपाऊंड येथील 4 कुटूंबांना शाळा क्र. 39 येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.
रात्रीच्या वेळी गरज भासल्यास सुमारे 3000 अन्नाच्या पाकीटांची व्यवस्था केल्याचे आपत्कालीन विभागप्रमुख श्री.शाकीब खर्बे यांनी सांगितले आहे. महानगरपालिकेचे सर्व अभियंते, प्रभाग अधिकारी, आरोग्य विभाग, आपत्कालीन विभाग हे प्रत्यक्ष घटनास्थळी वेळोवेळी उपस्थित असल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस पडुन देखील महानगरपालिका क्षेत्रामध्ये कुठेही हानी झाल्याचे आढळून आले नाही.
आपत्कालीन परिस्थतीत नागरीकांनी त्वरीत आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधुन जवळच्या स्थलांतर केंद्रावर जाण्याचे आवाहन मा. प्रशासक तथा आयुक्त श्री. अनमोल सागर यांनी केले आहे. तसेच, नागरीकांकरिता राहण्याची व जेवणाची देखील व्यवस्था केली असून, नागरीकांनी कोणत्याही परिस्थतीत आपला जीव धोक्यात घालू नये असे देखील आवाहन केले आहे.









