Home latest News एफजीडी बंद करण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध : प्रदूषणामुळे शेती व फळपिकांवर गंभीर...

एफजीडी बंद करण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध : प्रदूषणामुळे शेती व फळपिकांवर गंभीर परिणाम

55

एफजीडी बंद करण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध : प्रदूषणामुळे शेती व फळपिकांवर गंभीर परिणाम

अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर

डहाणूतील जनसुनावणीत शेतकरी–नागरिकांचा आक्रोश : पर्यावरण व शेती वाचवण्यासाठी एफजीडी कायम ठेवण्याची ठाम मागणी
औष्णिक वीज प्रकल्पातील फ्लू गॅस डीसल्फरडायझेशन (एफजीडी) यंत्रणा बंद करण्यास शेतकरी, बागायतदार व नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. औष्णिक वीज प्रकल्पातून कोळसा जाळल्यानंतर निघणाऱ्या धुराबरोबर बाहेर पडणारा सल्फर डायऑक्साइड (SO₂) नियंत्रित करण्यासाठी एफजीडी यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, ही यंत्रणा बंद करण्यास परवानगी द्यावी, अशी याचिका अदानी पॉवर कंपनीने डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाकडे सादर केली होती.
बुधवारी डहाणू येथे या याचिकेवर जनसुनावणी झाली. या सुनावणीसाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी, बागायतदार आणि नागरिक उपस्थित होते. निवृत्त न्यायमूर्ती अरुण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी पार पडली. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी वीरेंद्रसिंग आणि समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.
सुनावणीदरम्यान शेकडो नागरिकांनी एफजीडी बंद करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत, ही यंत्रणा कायम ठेवण्यात यावी, अशी ठाम मागणी केली. न्यायालयाच्या आदेशानुसार डहाणू परिसरात सल्फर डायऑक्साइड वायूची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. एफजीडी यंत्रणा बंद झाल्यास या मर्यादेचे उल्लंघन होईल, याकडे उपस्थितांनी लक्ष वेधले. तसेच, हवेतील प्रदूषणाचे प्रमाण तपासण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांनी सांगितले की, प्रदूषणामुळे शेती व फळांवर गंभीर परिणाम होत आहेत. चिकू फळ काळसर पडण्याचे प्रमाण वाढले असून उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. याशिवाय नारळ, भाजीपाला, खाडीतील मासेमारी व इतर कृषी उत्पादनावरही परिणाम होत असल्याने एफजीडी युनिट बंद करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी नागरिक व शेतकऱ्यांनी केली.
या वेळी आमदार विनोद निकोले यांनी भाष्य करताना, “परिसरातील प्रदूषणामुळे शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत आहे. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने फसवणूक झाली आहे. औष्णिक वीज कंपनीने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्थानिकांना विश्वासात घ्यावे,” असे आवाहन केले.
तर, अदानी औष्णिक वीज प्रकल्पाच्या वतीने मांडण्यात आले की, शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा प्रदूषणाची पातळी कमी झाल्याने एफजीडी बंद करणे आवश्यक आहे. मात्र, प्राधिकरणाने कंपनीला आदेश दिला आहे की, एफजीडी शिवाय प्रकल्प कार्यरत ठेवण्यापूर्वी हवेतील सल्फर डायऑक्साइडचे प्रमाण किती आहे, याचा अहवाल सादर करावा.

चौकट

फ्लू गॅस डीसल्फरडायझेशन (एफजीडी) ही औष्णिक वीज प्रकल्पात वापरली जाणारी प्रक्रिया असून, जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या धुरातील सल्फर डायऑक्साइड (SO₂) सारख्या हानिकारक वायूंचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. यंत्रणा बंद केल्यास प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन श्वास घेणे देखील कठीण होईल, असा तज्ज्ञांचा इशारा आहे.

कोट
“डहाणू पर्यावरण संरक्षण समितीमार्फत आयोजित जनसुनावणीला स्थानिक चिकू बागायतदार व शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शविला आहे. FGD प्लांटमुळे झाडांवर राख व सल्फर साचून थेट शेतीचे, विशेषतः चिकू उत्पादनाचे मोठे नुकसान होत आहे. हा प्रश्न शेतकऱ्यांच्या जगण्याशी निगडीत असल्याने त्यांचा आक्रोश रास्त आहे.
पर्यावरणपूरक धोरणे राबवणे आणि स्थानिक शेतकरी तसेच नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही ठामपणे मागणी करतो की FGD प्लांट तातडीने थांबवावा व वीज निर्मितीसाठी पर्यावरण व शेतकऱ्यांना अपायकारक ठरणारे पर्याय न वापरता, अन्य स्वच्छ व पर्यायी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.”**

मिहीर शाहा, माजी नगराध्यक्ष, डहाणू