Home latest News पनवेल मध्ये विचुंबे गावात भव्यदिव्य संविधान सन्मान रॅलीचे आयोजन
पनवेल मध्ये विचुंबे गावात भव्यदिव्य
संविधान सन्मान रॅलीचे आयोजन
अरुणकुमार करंदीकर
पनवेल शहर प्रतिनिधी
मो.क्र. 7715918136
पनवेल : जगामध्ये प्रत्येक देशाला स्वतः चे संविधान आहे. तसेच आपल्या भारत देशाला सुध्दा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले आहे. आपल्या ह्या संविधानाला भारताचे संविधान म्हणतात. भारत देशातील प्रत्येक नागरिकाच्या हिताचा , सुखाचा त्यांच्या जीवन कल्याणाचा विचार भारताच्या संविधानात मांडलेला आहे. ह्या अर्थाने भारताचे संविधान समग्र भारतीय जनतेचा खरा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. बाळ आईच्या पोटात असल्यापासून त्या बाळाचा जन्म होईपर्यंत , तसेच त्याचे अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक , महाविद्यालयीन शिक्षण , त्याची नोकरी, वेतन, आरक्षण, प्रमोशन, पेन्शन तसेच त्याचा रोजगार, व्यवसायाचे स्वातंत्र्य, आरोग्याची काळजी अशा ह्या सर्व जीवनावश्यक सुख सुविधा संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
दलित , शोषित, पिडित, वंचित, अन्यायग्रस्त समाजाला आपलेही काही देणे लागते आहे अशा विचारांनी एकत्र येऊन पनवेल येथील विचुंबे गावातील शिव , फुले, शाहु, आंबेडकर विचार मंच ह्या होतकरू कार्यकर्त्यांच्या सामाजिक संघटनेच्या वतीने संविधान मुल्यांचा जागर आणि सामाजिक सलोखा वृध्दिंगत करण्यासाठी रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता 76 व्या भारतीय संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने भव्य संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. संविधान सन्मान रॅली नंतर झालेल्या सभेला संबोधित करण्यासाठी विशेष मार्गदर्शक वक्ते म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे वकील, संविधान विश्लेषक, सत्यशोधक युवा समाज प्रबोधनाकार शिवश्री अॅड. रोशन पाटील साहेब उपस्थित होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून राष्ट्रपुरुषांच्या जयघोषात संविधान सन्मान रॅलीचा शुभारंभ करण्यात आला होता .सदर भव्य संविधान सन्मान रॅलीला विचुंबे गावातील छत्रपतींचा शिवाजी महाराज चौक येथुन सुरुवात झाली. तिथुन पुढे गावदेवी नाका ते पाण्याची टाकी ते पाण्याची टाकी ते ग्रीन व्हॅली, ग्रीन व्हॅली ते विठ्ठल मंदिरापर्यंत चौफेर मार्गक्रमण करीत सभास्थानी रॅली संपन्न झाली. यादरम्यान सर्व जातीधर्माच्या शेकडो नागरिकांनी स्वयं प्रेरणेने रॅलीत सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह व्दिगुणित झाला होता .
रॅली नंतर झालेल्या सभेत अॅड. रोशन पाटील आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते विचारपीठावरील राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून आणि दिपप्रज्वलन केल्यानंतर जमलेल्या लोकांना प्रमुख वक्त्यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर तसेच संविधानातील मुल्यांचा गौरव केला आणि कलमांचे महत्व विशद करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सभेनंतर कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच संपूर्ण कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या आणि रॅलीसह संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न करणा-या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार व आभार व्यक्त करुन भारतीय राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.