Home E-Paper गृप ग्रामपंचायत बऱ्हाणपूरची ग्रामसभा सोमटा येथे उत्साहात संपन्न
गावाच्या प्रगतीचा मार्ग निश्चित करण्यासाठी आगामी विकासकामांवर सविस्तर केली चर्चा
भरत पुंजारा
पालघर तालुका प्रतिनिधी
मो. ९९२३८२४४०७
सोमटा : गृप ग्रामपंचायत बऱ्हाणपूर यांच्या वतीने ग्रामसभा सोमटा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. ग्रामविकास व सार्वजनिक सुविधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही सभा ग्रामस्थांच्या मोठ्या संख्येतील उपस्थितीमुळे विशेष ठरली. गावाच्या प्रगतीचा मार्ग निश्चित करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या व आगामी विकासकामांवर सविस्तर चर्चा या ग्रामसभेत करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. हर्षला पुंजारा होत्या, तर ग्रामविकास अधिकारी श्री. बिपिन जाधव यांनी कार्यवाहीचे मार्गदर्शन केले. उपसरपंच श्री. प्रशांत तांबडा, ग्रामपंचायत सदस्य तसेच कृषी अधिकारी श्री. प्रितम गोवारी आदी मान्यवरांची उपस्थिती ग्रामसभेची शोभा वाढवणारी ठरली.
या ग्रामसभेमध्ये खालील विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली— पाणीपुरवठा व स्वच्छता
शाळा, अंगणवाडी व आरोग्य सुविधा
कृषी विकास व शेतकऱ्यांसाठी शासकीय योजनांची माहिती
गावातील सार्वजनिक जागांची सौंदर्यीकरण व संरक्षण
याप्रसंगी ग्रामस्थांनी आपल्या मागण्या, सुचना व अडचणी प्रामाणिकपणे मांडल्या. अधिकाऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सुधारणा व विकासकामे प्राधान्याने राबविण्याचे आश्वासन दिले.
गावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामसभा हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे ही सभा यशस्वीरीत्या संपन्न झाल्याबद्दल सरपंच, ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.