Home latest News महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे शासकीय मानवंदना 

महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे शासकीय मानवंदना 

63

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते बाळासाहेब आंबेडकर , रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर उपस्थित

अरुणकुमार करंदीकर

पनवेल शहर प्रतिनिधी

मो.क्र. 7715918136

पनवेल : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईच्या दादर मधील चैत्यभूमी येथे सार्वभौम राष्ट्राचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते बाळासाहेब आंबेडकर , रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड . आशिष शेलार, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालक मंत्री मंगल प्रभात लोढा, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट , माजी खासदार राहुल शेवाळे, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार श्रीम. चित्रा वाघ, आमदार अमित साटम, महाराष्ट्र राज्य त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र जाधव, बृहन्मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त भुषण गगरानी, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. श्रीम. अश्विनी जोशी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे , डॉ . बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, उपाध्यक्ष महेंद्र साळवे महापालिका उपायुक्त प्रशांत सपकाळे, जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते आदींसह सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय संविधानाचे एकमेव निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपरोक्त सर्व मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीस व विनम्र अभिवादन केले. तसेच माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते भिक्खुंना चीवरदान करण्यात आले. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. यावेळी चैत्यभूमीवर हेलीकाॅप्टर मधुन पुष्पवृष्टी करण्यात आली.

कोणत्याही राष्ट्रात युगपुरुष जन्माला येतात . तेव्हा सामाजिक न्यायाची चळवळ बळकट होते. भारत हा विविधतेने नटलेला देश असून इतक्या मोठ्या राष्ट्रात एकता, न्याय व समाजाची संघटीत भावना दृढ करण्यासाठी संविधान निर्माण करणे हे अत्यंत महत्त्वाचे मोठें व ऐतिहासिक कार्य होते. देशाच्या सामाजिक विविधतेत सर्वांना एकत्र बांधणारे व समान अधिकार प्रदान करणारे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राला दिले ,एखादे राष्ट्रपुरुष जनतेच्या अंत: करणात सदैव जिवंत राहतात. त्यातूनच बाबासाहेब अमर आहेत. कठोर परिस्थितीत शिकुन त्यांनी संपूर्ण देशातील जनतेचा भविष्यकाळ बदलण्यासाठी शिक्षणाला सर्वात मोठे शस्त्र मानले. एक सुशिक्षित व्यक्ती संपूर्ण घरांचे, समाजाचे, देशाचे भविष्य बदलु शकतो. हा संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतुन दिला. असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

तसेच यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ज्ञानाच्या बळावर बाबासाहेबांनी समाजात समता प्रस्थापित केली. बाबासाहेबांनी विषमता दूर करून समाजात समता, बंधुता आणि सर्वांना समान संधी देणारे संविधान देशाला दिले. त्याच अनुषंगाने त्यांनी ज्ञानाच्या बळावर समाजात समता दृढ केली. बाबासाहेबांच्या दुरदृष्टीमुळे आज भारत देशाची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकावर ठरली असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार आहे. आपल्या राष्ट्राच्या प्रगतीचा पाया बाबासाहेबांनीच घातल्याचे त्यांनी नमुद केले आहे. भारतीय लोकशाहीची भक्कम पायाभरणी आणि सामान्य जनतेच्या हक्कांचे रक्षण हे बाबासाहेबांच्या संविधानामुळेच शक्य झाले आहे. जगातील सर्वोत्तम संविधान भारताकडे असुन प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ह्याचं संविधानात मिळते . असे त्यांनी नमूद केले.आगामी काळात चैत्यभूमी परिसरातील स्मारकाच्या विकासाची कामे पुर्ण करण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करुन देशाच्या लोकशाहीचा पाया दृढ दिला . त्यांनी उभारलेला संघर्ष हा मानव मुक्तीचा , समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा होता. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही बाबासाहेबांनी जगाला दिलेली त्रिसूत्री आजही समाज परिवर्तनासाठी मार्गदर्शक आहे. न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ह्या चार मुल्यांवर आधारित संविधान तयार करून तळागाळातील वंचित व दुर्बल घटकांना सशक्त करण्याचे कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले.असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी सर्व मान्यवरांना संविधानाची प्रत भेट दिली.