Home latest News मुरुडमध्ये पगारी शिक्षक घेतात कोचिंग क्लासेस..

मुरुडमध्ये पगारी शिक्षक घेतात कोचिंग क्लासेस..

273

पालकांमध्ये वाढली चिंता,  शिक्षण संस्थांमध्ये तेंच शिक्षक क्लासेसला ही तेच शिक्षक..

गोरे दत्ता

मुरुड:  तालुक्यातील शैक्षणिकदृष्ट्या नावाजलेले मुरुड शहर सध्या पगारी असणारे शिक्षक व बोगस आणि नियमबाह्य कोचिंग क्लासेस घेणाऱ्या शिक्षका मुळे चर्चेत आहे. शहरात कोचिंग क्लासेसची संख्या झपाट्याने वाढत असून,अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याची चर्चा पालक व नागरिकांमध्ये सुरु आहे. विशेष म्हणजे त्यातील काही शिक्षक संस्थेवरील पगारी शिक्षक आहेत परंतु ते अतिरिक्त फीस घेऊन घरातूनच चालवणारे क्लासेस, परवान्यां बाबतची अस्पष्टता आणि कर भरण्याची अनिश्चितता यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

मुरुड शहर हे परिसरातील सुमारे ५० गावांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक केंद्र आहे.उच्च दर्जाच्या शाळा आणि महाविद्यालयांमुळे गावाला विशेष ओळख प्राप्त झाली आहे. मात्र, याच शैक्षणिक क्षेत्रात काही ठिकाणी अनियमितता वाढताना दिसत असून, क्लासेस व्यवसाय काळोखात जात असल्याची खंत पालक व्यक्त करत आहेत.अनेक पालकांच्या म्हणण्यानुसार,काही शिक्षक व क्लासेस संचालक यांच्यातील ‘अघोषित युती’मुळे क्लासेसचा आर्थिक व्यवहार लाखोंमध्ये जात असून, काही सरकारी किंवा शिक्षक नियमांचे पालन न करता खाजगी शिकवण्या घेत असल्याची चर्चा आहे.शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांमधील शिक्षकांना खाजगी शिकवण्या घेण्यास स्पष्ट मनाई असतानाही परिस्थिती वेगळीच दिसत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

याबाबत काही विद्यार्थ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की,तोंडी परीक्षेतील २० अंतर्गत गुणांच्या नावाखाली विशिष्ट क्लासेसमध्ये प्रवेश घेण्याचा दबाव टाकला जात आहे. त्यामुळे पालक अस्वस्थ आहेत.काही क्लासेस महिलांच्या नावावर चालवले जातात,मात्र प्रत्यक्षात त्यांचे संचालन शिक्षक किंवा इतर व्यक्ती करतात,अशीही चर्चा आहे. त्यामुळे परवानाधारक, प्रत्यक्ष संचालक,कर भरणे आणि नियमांचे पालन याबाबत प्रश्न निर्माण होत आहेत.

सध्या मुरुडमध्ये ३० ते ३५ शिक्षक कोणत्या ना कोणत्या शाळा किंवा महाविद्यालयात कायमस्वरूपी कार्यरत असूनही खाजगी कोचिंग क्लासेस घेत असल्याची माहिती पालकांनी पुढे आणली आहे. या पार्श्वभूमीवर काही शिक्षकांना राजकीय पाठबळ असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.पालकांनी यासंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा निवेदन दिल्याचे सांगितले जाते. मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने पालकांचे प्रश्न अधिकच गंभीर झाले आहेत.

शहरात या विषयावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून, प्रशासन कोणती पावले उचलते याकडे नागरिकांचे लक्ष केंद्रीत झाले आहे परंतु या अगोदरही पगारी शिक्षक असताना सुद्धा प्रायव्हेट क्लासेस घेऊन भरमसाठ फी घेऊन आपली मनमानी घरी, बसूनच करीत असल्याची चर्चा सुद्धा मुरुड मध्ये आहे त्यामुळे या अगोदर खाजगी क्लासेस च्या बाबतीमध्ये जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या परंतु शिक्षणाधिकाऱ्याकडूनचं चिरीमिरी घेऊन कुठल्याही प्रकारची कारवाई शिक्षणाधिकारी करीत नसल्याचे उलट सुलट चर्चला उधाण आले असून या सर्व गोष्टीला शिक्षण अधिकारीच मुरुड मधल्या क्लासेसला पाठबळ दिसत असल्याचे काही पालक व क्लासेस घेणारे शिक्षक यांच्याकडून चर्चा होताना मुरुड मध्ये दिसत आहे.