Home latest News शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक; गुंतवणूक टोळीवर कारवाईची मागणी

शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक; गुंतवणूक टोळीवर कारवाईची मागणी

64

शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक; गुंतवणूक टोळीवर कारवाईची मागणी

भरत पुंजारा

पालघर तालुका प्रतिनिधी

मो.९९२३८२४४०७

डहाणू तालुक्यातील वाकी-झारलीपाडा येथील रहिवासी चंद्रकांत रघु घोरखना यांनी मातृभूमी रिअल टच डेव्हलपमेंट लिमिटेड या गुंतवणूक कंपनीच्या नावाखाली शेकडो शेतकऱ्यांची झालेली आर्थिक फसवणूक उघड करत पोलीस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून १३ डिसेंबरपासून डहाणू पोलीस ठाण्यासमोर बेमुद्दत ठिय्या आंदोलन छेडण्याची चेतावणी दिली आहे.

घोरखना यांनी ७ डिसेंबर २०२५ रोजी डहाणू पोलीस निरीक्षकांकडे दिलेल्या लेखी तक्रारीत २०१७ पासून सुरु असलेल्या या फसवणूक प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते मौजे डहाणू खाडी, कवाडा-तलासरी, बोईसर,आगर, सरावली, रामपूर, रानशेत आणि वाणगाव येथील संबंधित व्यक्तींनी स्वतःला कंपनीचे टीम लीडर व ब्रँच मॅनेजर म्हणून भासवत शेतकऱ्यांना गुंतवणुकीचे आमिष दाखवले. कंपनी अतिशय नामांकित व सुरक्षित असल्याचे सांगत त्यांच्यासह अनेक शेतकऱ्यांकडून मोठ्या रकमा घेतल्या. या संदर्भात घोरखना यांनी २९ जुलै २०१९ रोजी एक डहाणू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा गुन्हा दाखल करण्यासाठी व संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी नवी तक्रार सादर केली आहे.

दरम्यान, अपेक्षित कारवाई न झाल्यास १३ डिसेंबर २०२५ पासून किसान सभेच्या वतीने तसेच फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांसह डहाणू पोलीस ठाण्यासमोर बेमुद्दत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा घोरखना यांनी दिला आहे. आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील, असेही त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणामुळे डहाणू व तलासरी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून तातडीने गुन्हा नोंदवून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.