Home latest News सीएसआर क्षेत्राला नवी दिशा : चेंजमेकर्स सर्कलचे आयोजन

सीएसआर क्षेत्राला नवी दिशा : चेंजमेकर्स सर्कलचे आयोजन

159

सीएसआर क्षेत्राला नवी दिशा : चेंजमेकर्स सर्कलचे आयोजन

संदेश साळुंके

टाइम्स फाउंडेशनच्या पुढाकारातून पुण्यात ‘सीएसआर चेंजमेकर्स सर्कल’ या महत्त्वपूर्ण आणि प्रभावी उपक्रमाचे आयोजन बुधवार, ७ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले. क्राईस्ट युनिव्हर्सिटी, पुणे-लवासा कॅम्पस येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला क्राईस्ट युनिव्हर्सिटी, M3M फाउंडेशन आणि कराडी पाथ या भागीदारांचे मोलाचे सहकार्य लाभले. समाज कल्याण, शाश्वत विकास आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध घटकांना एकत्र आणणारा हा कार्यक्रम ठरला.

महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या आयुक्त श्रीमती दीपा मुधोळ मुंडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मुळशीचे तहसीलदार श्री. विजयकुमार चोबे हे सन्माननीय पाहुणे होते. पुणे, मुंबई, नाशिक आणि सोलापूर येथून आलेले सीएसआर नेते, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांनी समाज कल्याण कार्य केवळ योजनांपुरते मर्यादित न राहता त्याचा प्रत्यक्ष परिणाम लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे किती आवश्यक आहे, यावर सखोल मार्गदर्शन केले. शासन, कॉर्पोरेट क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्थांमधील समन्वय अधिक मजबूत झाल्यास समाजात परिवर्तन शक्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमात डॉ. फादर लिजो थॉमस (डीन व संचालक, क्राईस्ट युनिव्हर्सिटी), डॉ. ऐश्वर्या महाजन (अध्यक्ष, M3M फाउंडेशन) आणि डॉ. सी. पी. विश्वनाथ (सीईओ, कराडी पाथ एज्युकेशन कंपनी) यांनी मार्गदर्शक भाषणे देत सीएसआरच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सक्षमीकरणात होणाऱ्या बदलांवर प्रकाश टाकला.

‘Think Critically, Act Effectively’ या विषयावरील पॅनल चर्चेत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी व्यावहारिक अनुभव, आव्हाने आणि उपाययोजना मांडल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सरकारी अधिकारी, सीएसआर प्रमुख आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये अर्थपूर्ण संवाद व नेटवर्किंग झाले.

हा कार्यक्रम समाज परिवर्तनासाठी केवळ चर्चा न करता कृतीकडे नेणारा ठरला असून, टाइम्स फाउंडेशनच्या ‘चेंजमेकर्स सिरीज’ अंतर्गत भविष्यातही अशाच परिणामकारक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.