महापरिनिर्वाण दिनी शालेय साहित्य अर्पण करण्याचे आवाहन
अरुणकुमार करंदीकर
पनवेल शहर प्रतिनिधी
मो.क्र. 7715918136
पनवेल : समाजात काही माणसं कर्तुत्वाने आणि मनानेही श्रेष्ठ असतात. अशी माणसं आपला मोठेपणा दिसण्यातुन नव्हे तर वागण्यातुन , कृतीतुन आणि कार्यातुन दाखवून देत असतात. त्यांना एखाद्या गोष्टीचं भांडवल किंवा दिखाऊपणा करुन लोकांची सहानुभूती मिळवता येत नाही. असे सामाजिक बांधिलकी आणि समाज भावना जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते , महाराष्ट्र राज्य समाज भूषण पुरस्कार प्राप्त आयु. राजु झनके हे आहेत.
मुंबईसह महाराष्ट्र राज्यातील दलित, शोषित, वंचित, पिडित, असलेल्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा मदतीचा हातभार देण्यासाठी मागील दहा वर्षांपासून ते संस्थापक – अध्यक्ष असलेल्या महामानव प्रतिष्ठान ह्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ‘ एक वही, एक पेन ‘ हे समाजोपयोगी अभियान राबवुन हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचं फार मोठं मोलाचं काम त्यांनी ह्या उपक्रमाव्दारे केलेलं आहे. महापुरुषांचा महापरिनिर्वाण दिन , जयंती, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा अनेक उत्सवानिमित्त जनतेने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी आवाहन व प्रयत्न केल्यामुळे त्यांना मागील दहा वर्षांपासून त्यांच्या ह्या कार्याला समाजातुन भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या उल्लेखनीय अभियानाच्या कार्याची दखल घेऊन राज्य, देशपातळीवर कार्यरत असलेल्या अनेक संघटनांनी गौरव करुन त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
त्याच अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे यंदाही विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण निमित्त दिनी आपल्या ‘ एक वही, एक पेन ‘ ह्या उपक्रमाव्दारे गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य अर्पण करण्याचे आवाहन केले आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातील अनुयायी फार मोठ्या प्रमाणात हार फुले, मेणबत्ती, अगरबत्ती आदी साहित्य अर्पण करून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून मानवंदना देतात. हे सर्व साहित्य काही दिवसांनंतर निस्तेज आणि नष्ट होते तसेच ते नंतर कच-यात फेकुन देण्यात येत असते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एकमेव प्रकांड पंडित होते. त्यांनी अनेक पदव्या मिळवल्या तसेच त्यांनी पुस्तकांसाठी स्वतंत्र घर उभे केले होते. अनेक विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. आज देशातील लाखो विद्यार्थी त्यांच्यावर पीएचडी करीत आहेत. ” शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. जो प्राशन करेल तो गूरगूरल्याशिवाय राहणार नाही.” हा बाबासाहेबांचा महामुलमंत्र लक्षात ठेवून समाजातील सर्वच स्तरातील लोकांनी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे.
तथापि, समाजातील संस्था, संघटना, मंडळे , विहार व पुतळा समित्या, जयंती कमिट्यांनी अशी जबाबदारी घेऊन जनतेला सुध्दा हार फुलांऐवजी शैक्षणिक साहित्य महापरिनिर्वाण दिनी अर्पण करण्याचे आवाहन करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या सर्वगुणसंपन्न, सर्वश्रेष्ठ , महाज्ञानी, प्रकांड पंडित असलेल्या महामानवाला हार फुले, मेणबत्ती, अगरबत्ती आदी नाशवंत साहित्यांची मानवंदना अपेक्षित असु शकते काय ? त्यास अनुसरून समाजातील वंचित, आर्थिक दुर्बल घटकातील, आदिवासी व पुरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी शैक्षणिक साहित्यांनी अभिवादन करुया. जमा होणारे सर्व शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवुया. – दिनांक – 5 व 6 डिसेंबर 2025 , रोजी , सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी – भारतीय बौध्द महासभा, मुख्य कार्यालय मंडप , सेनापती बापट पुतळा, चैत्यभूमी दादर ह्या ठिकाणी संस्थेच्या केंद्रात महापरिनिर्वाण दिनी शैक्षणिक साहित्य स्वीकारले जाणार आहे.









