Home latest News वयम चळवळीच्या कायदेशीर मार्गदर्शनामुळे बेजपाडा ग्रामस्थांना मिळाला पेसा आणि सामूहिक वनहक्क व्यवस्थापनचा...

वयम चळवळीच्या कायदेशीर मार्गदर्शनामुळे बेजपाडा ग्रामस्थांना मिळाला पेसा आणि सामूहिक वनहक्क व्यवस्थापनचा अधिकार!

255

वयम चळवळीच्या कायदेशीर मार्गदर्शनामुळे बेजपाडा ग्रामस्थांना मिळाला पेसा आणि सामूहिक वनहक्क व्यवस्थापनचा अधिकार!

विक्रमगड प्रतिनिधी

भारत पाटारा 8779829335

जव्हार(पालघर): वयम चळवळ जव्हार, यांच्या कायदेशीर आणि प्रभावी मार्गदर्शनामुळे जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत आयरे अंतर्गत असलेल्या पेसा गाव बेजपाडा येथील ग्रामस्थांनी आपल्या गावाचा कारभार स्वतःच्या हाती घेऊन अभूतपूर्व असा कायापालट घडवला आहे. शासकीय योजनांचा लाभ आणि ग्रामसभांच्या माध्यमातून घेतलेल्या निर्णायक धोरणांमुळे बेजपाडा गाव आज स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करत आहे.

कायदेशीर अधिकारांचा प्रभावी वापर

बेजपाडा हे गाव पेसा कायद्यांतर्गत स्वतंत्र पेसा गाव घोषित असल्याने, येथील ग्रामसभेला विशेष अधिकार प्राप्त आहेत. वयम चळवळीच्या कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांना पेसा कायदा, वनहक्क कायदा, रोजगार हमी योजना, ग्रामपंचायत अधिनियम या कायद्यातील तरतुदी, ग्रामपंचायतीचे अधिकार आणि विविध शासकीय योजनांची सखोल माहिती दिली.वयम च्या कायदेशीर मार्गदर्शनामुळे ग्रामस्थांनी उत्पादक ग्रामसभांचे आयोजन करून खालीलप्रमाणे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले:

शासकीय निधीचे योग्य नियोजन:* ग्रामस्थांनी पेसा अंतर्गत मिळणाऱ्या निधीचा वापर सामूहिक हिताच्या कामांसाठी करण्यासाठी योजना आखली

रोजगार हमी (NREGA) कामांमध्ये वाढ, वयमच्या मदतीने ग्रामस्थांनी एकत्र येऊन मागणीपत्रे दिली, ज्यामुळे अनेक वर्षांपासून काम न मिळालेल्या लोकांना गावातच रोजगार उपलब्ध झाला.त्यामुळे येथील होणारे स्थलांतरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले.

नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि संवर्धन:* ग्रामसभेने सामूहिक वनहक्क दावा करून 50 हेक्टर क्षेत्रात जल, जमीन, आणि जंगल या नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन आणि संरक्षण करण्याचे अधिकार स्वतःकडे घेतले.तसेच उर्वरित क्षेत्रावर अपील दाखल केलेले आहे.

बेजपाडा गावाचा बदललेला चेहरा

वयम चळवळीच्या सहकार्यातून ग्रामस्थांनी एकत्रितपणे श्रमदान आणि उपलब्ध निधीतून अनेक विकासकामे मार्गी लावली:

रस्ता करून मिळाला: आयरे ते हाडे या मुख्य रस्त्यापासून 1 कि.मी. अंतर असलेला गावात जाणारा रस्ताच नव्हता.फक्त पायवाट असल्याने गावात कोणतेही वाहन येत नव्हते.त्यामुळे रेशन, आजारी व्यक्ती गरोदर महिला तसेच शाळेतील विध्यार्थी यांना खूप त्रास सहन करावा लागला. वयम चळवळीचे मार्गदर्शन आणि ग्रामस्थांनी केलेल्या सततचे पाठपुराव्यामुळे बेजपाडा येथे रोजगार हमी योजने अंतर्गत गावात जाणारा कायमचा रस्ता तयार करून मिळाला.

पाणी समस्या दूर: पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विहीर खोलीकरण आणि नवीन जलस्रोतांचे नियोजन करण्यात आले.

उत्पन्नात वाढ: शेती आणि वन-उत्पादनावर आधारित छोटे उद्योग सुरू करण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.तसेच सुपोषण भाजीवाडी प्रकल्पमुळे येथील गावकऱ्यांचे आहारात रोजचा सेंद्रिय भाजीपाला मिळू लागला आहे.

शिक्षण आणि आरोग्य:गावातील शाळा आणि आरोग्याच्या सुविधा सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले गेले.

बेजपाडा ग्रामस्थ जत्रू घाटाळ यांचा अनुभव:

“वयंम चळवळीने आम्हाला आमचे अधिकार समजावले. आता आम्ही फक्त शासकीय मदतीची वाट पाहत नाही, तर आमच्या गावाचे निर्णय आम्ही स्वतः घेतो. हा आत्मविश्वास आमच्यासाठी सर्वात मोठा कायापालट आहे.”

वयम चळवळीच्या माध्यमातून मिळालेल्या कायदेशीर ज्ञानाचा उपयोग करून बेजपाडा गावाने केवळ विकास साधला नाही, तर स्वशासन अर्थात पाडोपाडी स्वराज्य कशाप्रकारे प्रभावीपणे राबवले जाऊ शकते, याचा एक आदर्श इतर पेसा गावांसमोर ठेवला आहे.वयम चळवळ ही संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून पालघरमध्ये जव्हार मोखाडा, विक्रमगड तसेच नाशिक मध्ये त्र्यंबकेश्वर मधील इतर गावांनाही प्रेरणा देत आहे.वयम चळवळीची *आपल्या विकासाची आपली चळवळ* ही संकल्पना बेजपाडामध्ये खऱ्या अर्थाने साकार झाली आहे.