Home latest News धुळे-सोलापूर महमार्गावर लुटमारीच्या घटना; खा.बजरंग सोनवणेंनी घातले लक्ष

धुळे-सोलापूर महमार्गावर लुटमारीच्या घटना; खा.बजरंग सोनवणेंनी घातले लक्ष

72

जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिले पत्र

बीड: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लुटमारीच्या घटना वाढत आहेत. वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत तातडीने कारवाई करावी, असे पत्र खा.बजरंग सोनवणे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना दिले आहे. दोन दिवसांपुर्वी गेवराई जवळ झालेल्या गुन्हेगारी घटनेमुळे बीडची बदनामी देखील होत असल्याची चिंता खा.बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केली आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात एक अत्यंत गंभीर घटना नुकतीच घडली असून याची विशेष दखल घ्यावी. काही दिवसांपुर्वी तेलंगणा राज्यातील शिवप्रसाद पौने हे आपल्या कुटुंबासह खासगी वाहनाने शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जात होते. प्रवासादरम्यान बीडमार्गे जात असताना त्यांचे वाहन गेवराईजवळील गढी येथे थांबले असता, काही अज्ञात चोरट्यांनी अचानक त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या संपूर्ण घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना अडवून अशा प्रकारची लूट करणे ही अत्यंत चिंताजनक व गंभीर बाब आहे.

अशा घटनांमुळे बाहेरील राज्यांतून येणाऱ्या भाविक व पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन जिल्हयाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने महामार्गावर पोलीस पेट्रोलिंग वाढविण्यात यावे, रात्रीच्या वेळेस विशेष पथके तैनात करून सतत नाकाबंदी व गस्त ठेवण्यात यावी, संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, हायवे पेट्रोलिंग व्हॅन आणि तात्काळ प्रतिसाद प्रणाली मजबूत करावी, या प्रकरणातील आरोपींचा लवकरात लवकर मागोवा घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, ज्यामुळे अशा गुंडांना धडा मिळेल. प्रवाशांची सुरक्षितता ही प्राथमिक जबाबदारी असून या संदर्भात ठोस आणि परिणामकारक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे, असेही म्हटले आहे.

खा.बजरंग सोनवणे हे जिल्ह्यातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. सामान्य माणसांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते करत असलेला पाठपुरावा हा कौतूकास्पद आहे.