Home latest News उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात रिपब्लिकन सेनेचा वर्धापनदिन संपन्न
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात
रिपब्लिकन सेनेचा वर्धापनदिन संपन्न
भीमसैनिक व शिवसैनिकांचा जल्लोष
अरुणकुमार करंदीकर
पनवेल शहर प्रतिनिधी
मो.क्र. 7715918136
पनवेल : ठाण्यातील तलाव पाळी येथील शिवाजी मैदानात रिपब्लिकन सेनेचा 11 वा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 25 वर्षांपूर्वी याच ठाण्यात आनंद दिघे साहेबांनी शिवशक्ती आणि भिमशक्तीची मुहूर्तमेढ रोवली होती . रिपब्लिकन नेते आनंदराज आंबेडकर यांच्या सोबत आमची झालेली युती ही केवळ खुर्ची मिळवण्यासाठी नव्हे , तर समाजातील सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी आहे. आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे रक्त आहेत आणि आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे भक्त आहोत.असे ठाम प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
आनंदराज आंबेडकरांविषयी बोलताना शिंदे म्हणाले की, त्यांनी कुठल्याही अटी शर्थी न ठेवता युती केली. माझ्या कार्यकर्त्यांला न्याय मिळाला पाहिजे. हीच त्यांची एकमेव मागणी होती. आमची युती सत्तेसाठी नाही, तर दलित, शोषित, वंचित, पिडित व अन्यायग्रस्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘ शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ‘ ह्या विचारांचा उल्लेख करून शिवशक्ती आणि भिमशक्तीची युती ही वज्रमूठ असल्याआ दावा केला. सदर कार्यक्रमास रिपब्लिकन सेनेचे प्रमुख सरसेनानी आनंदराज आंबेडकर, युवा नेते अमन आंबेडकर, माजी नगरसेवक रामभाऊ तायडे , आबासाहेब चासकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, संजीव बावधनकर, बाळासाहेब ओव्हाळ, सुनिल वाघेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिंदे पुढे असेही म्हणाले की , ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे मैदान आहे आणि शेजारी आनंद दिघे साहेबांचे स्मारक आहे. हे ठिकाण स्वतः एक मोठे शक्तीस्थान आहे. शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र आली हा योगायोग नसुन एक मोठा इतिहास घडत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जगातले सर्वोत्तम संविधान दिले. त्या घटनेमुळे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला सुध्दा सर्वोच्च स्थान मिळाले आहे आणि इथुन पुढेही मिळणार आहे. असे सांगत त्यांनी उदाहरणादाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वतः चा उल्लेख केला.मी शेतकऱ्याचा मुलगा असुनही राज्याचा मुख्यमंत्री झालो आणि आता उपमुख्यमंत्री झालो आहे . तसेच नरेंद्र मोदी हेदेखील पंतप्रधान झाले . हे बाबासाहेबांच्या संविधानामुळेच शक्य झाले आहे. असेही त्यांनी नमूद केले.
बाबासाहेबांच्या कार्याची जपणुक व गौरव करण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगत त्यांनी इंदु मिल स्मारकाचे काम वेगाने सुरू असल्याचेही शिंदे यांनी सांगितले . तसेच महाराष्ट्र भुषण राम सुतार हे बाबासाहेबांचा पुतळा लवकरच उभारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळात सर्वसामान्य जनतेच्या जीवनात बदल घडविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला होता. लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही. आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत. असे त्यांनी खात्रीपूर्वक सांगितले. आगामी निवडणुकांचा उल्लेख करताना त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना एकजुट ठेवण्याचे आवाहन केले आणि शेवटी जयभीम, जय महाराष्ट्र आणि जय हिंद अशा घोषणांनी भाषणाची सांगता केली.