मुलाच्या हव्यासापोटी आईनेच मुलीला पाण्याच्या टाकीत फेकले.

बारामती तालुक्यातील माळेगाव येथे गेल्या चार दिसावापूर्वी पाण्याचा टाकीत मृतावस्थेत आढळलेल्या सव्वा महिन्याच्या चिमुकलीचा खून तिच्या आईनेच केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, तिसरे अपत्य मुलगीच झाल्याने आलेल्या नैराश्येतून मातेने मुलीला पाण्याच्या टाकीत फेकून दिले असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

बारामती;- माळेगाव बुद्रूक येथील चंदननगर भागात राहणाऱया अवघ्या सव्वा महिन्याच्या मुलीचा पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी या मुलीच्या आईला रविवारी दि. 29 रोजी रात्री अटक केली. सलग तिसरी मुलगी झाल्याने आणि वंशाला दिवा पाहिजे या हव्यासातून तिने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

दिपाली संजय झगडे रा. काटेवाडी, ता. बारामती असे अटक केलेल्या आईचे नाव आहे. काटेवाडी येथील दिपाली संजय झगडे ही गेल्या दोन महिन्यांपूर्वी बाळंतपणासाठी माळेगाव बुद्रूक येथे माहेरी आली होती. सव्वा महिन्यांपूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला. यापूर्वी तिला दोन मुली होत्या. तिसरीही मुलगीच झाल्याने दिपाली नैराश्येत गेली होती. त्यातून तिने बुधवारी दि. 25 तिची मुलगी गायब झाल्याचा बनाव रचला. मुलीला पाळण्यात झोपवून मी फरशीवर झोपले होते. झोपेतून उठल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास मुलगी पाळण्यात नसल्याचे तिने सांगितले. त्यानुसार मृत मुलीचे आजोबा संजय जाधव यांनी माळेगाव दूरक्षेत्रात याबाबत खबर दिली.

पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते, हवालदार जयंत ताकवणे, योगेश चितारे, खांडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घराजवळील प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकीत मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनेच्या दिवसानंतर तिची आई दवाखान्यात दाखल झाली होती. त्यामुळे पोलिसांचा तिच्यावर संशय बळावला. त्यानुसार पोलिसांनी तिची चौकशी केली. यावेळी तिने ‘सलग तिसरी मुलगी झाल्याने आणि वंशाला दिवा पाहिजे या हव्यासातून मुलीला पाण्याच्या टाकीत फेकल्याची कबुली दिली. बारामती तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here