Home latest News दारूच्या नशेत महिलेची छेड, हटकले असता टॉय पिस्तूल काढले.

दारूच्या नशेत महिलेची छेड, हटकले असता टॉय पिस्तूल काढले.

89

दारूच्या नशेत महिलेची छेड, हटकले असता टॉय पिस्तूल काढले.

नागपूर :- दारूच्या नशेत टुन्न असलेल्या गुंडांनी एका महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना याबाबत हटकले असता त्यांनी टॉय पिस्तूल काढून जीवे मारण्याची धमकी दिली. वर्धा मार्गावरच्या एका ढाब्यावर शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. यामुळे ढाब्यावर चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.

विठ्ठलनगर, मानेवाडा येथील अनुप अवधेश सिंग वय 37 हे शुक्रवारी रात्री वर्धा मार्गावरील लक्की ढाब्यावर जेवण करायला गेले होते. त्यांच्यासोबत एक महिला आणि एक मित्रही होता. तेथे मध्यरात्री आरोपी श्वेतांक ऊर्फ अनिकेत रामटेके, मयूर राजू बनकर दोघेही रा. नवीन बाबुळखेडा, अजनी शुभम संजय सोनी रा. धोबीघाट, अजनी आणि त्यांचे दोन साथीदार आले. ते दारूच्या नशेत टुन्न होते. सिंग यांच्यासोबत असलेल्या महिलेला पाहून ते अश्लील शेरेबाजी करू लागले. त्यामुळे सिंग यांचे मित्र हेमंत कुबडे यांनी आरोपींना समजाविले असता आरोपी शिवीगाळ करू लागले. एकाने त्याच्या खिशातील टॉय पिस्तूल काढले अन् कुबडेवर ताणले. त्याचे बॅरल मागे-पुढे ओढून आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी घालत असलेल्या हैदोसामुळे ढाब्यावर चांगलाच गोंधळ निर्माण झाला. माहिती कळताच बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी सिंग यांची तक्रार नोंदवून घेत आरोपी रामटेके, बनकर आणि सोनी या तिघांच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.