Home latest News शहरातील रेती तस्करीचा सुळसुळाट 

शहरातील रेती तस्करीचा सुळसुळाट 

104

शहरातील रेती तस्करीचा सुळसुळाट
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तस्कर बेलगाम!
पोलीस स्टेशनसमोरूनच खुलेआम तस्करी!

साहिल सैय्यद /प्रतिनिधि…
📲9307948197
घुग्घुस: शहरातील वर्धा नदीच्या चिंचोली व हल्ल्या घाटातून दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टर व हायवा वाहनांद्वारे अवैध रेती तस्करीला ऊत आला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही तस्करी पोलीस स्टेशन समोरूनच बेधडक केली जात आहे, त्यामुळे “तस्कर जोमात – प्रशासन कोमात” अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

पोलीस स्टेशनसमोरूनच खुलेआम तस्करी!

शहरात वेकोलीच्या कारगिल चौकातून दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या वेळी थेट पोलीस ठाण्यासमोरून रेती तस्करी केली जात आहे. ही बाब सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत संतापजनक ठरत आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या या गैरप्रकाराकडे प्रशासन आणि महसूल विभाग डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

पोलीस व महसूल विभाग कधी जागे होणार?

शहरातील सामान्य नागरिकांना ही चोरी उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि तहसीलदार मात्र या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत. नागरिकांचा संताप एवढा वाढला आहे की, “पोलिसांना या तस्करीचा पुरावा दिसावा म्हणून जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी त्यांच्यासाठी विशेष चष्म्यांची व्यवस्था करावी!” अशी बोचरी टीका नागरिक करत आहेत.

रेती तस्करीमुळे नागरिकांचे हाल – घर बांधण्याचे स्वप्न उद्ध्वस्त!

शहरात सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीमुळे घर बांधण्यासाठी लागणाऱ्या रेतीच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. महागड्या चोरीच्या रेतीमुळे सामान्य माणसाला घर बांधणे तर सोडाच, साधे शौचालय बांधणेही परवडेनासे झाले आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न अक्षरशः धुळीस मिळत आहे.

शासनाच्या निष्काळजीपणामुळे तस्करीला चालना!

सरकारकडून रेती घाटांचे लिलाव वेळेत न झाल्यामुळे तस्करीला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. अधिकृत लिलाव नसल्याने अवैध उत्खनन करणारे रेती माफिया मोकाट सुटले आहेत. यामुळे शासनालाही तस्करीला खतपाणी घालणारा मुख्य दोषी मानले जात आहे.

नागरिकांची मागणी – प्रशासनाने कठोर कारवाई करावी!

शहरवासीयांनी शासन व प्रशासनाला जागे करण्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. “जर अवैध रेती तस्करीला आळा घालण्यात आला नाही, तर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील,” असा इशारा देण्यात आला आहे.

शासन व प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे आणि अवैध रेती तस्करीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.