Home latest News *पेसा गाव वैतागवाडी ग्रामसभेत ऐतिहासिक ठराव:

*पेसा गाव वैतागवाडी ग्रामसभेत ऐतिहासिक ठराव:

47

*पेसा गाव वैतागवाडी ग्रामसभेत ऐतिहासिक ठराव:

सामूहिक वनहक्क क्षेत्रात ‘कुऱ्हाड-गेलोल- वाघुर ‘ बंदी; कुंभाडोंगर वणव्यावर नियंत्रण!*

विक्रमगड प्रतिनिधी
भारत पाटारा-8779829335

विक्रमगड : ग्रामपंचायत खुडेद पैकी पेसा गाव वैतागवाडी येथील ग्रामसभेने श्रीम. नंदा संदीप पाटारा यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता ग्रामसभा कार्यालय वैतागवाडी या ठिकाणी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत सामूहिक वनहक्क क्षेत्राचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी दोन अत्यंत महत्त्वाचे व ऐतिहासिक ठराव संमत केले आहेत. या निर्णयामुळे परिसरातील वनसंपदा आणि वन्यजीवांचे संरक्षण होणार असून जैवविविधतेला मोठा आधार मिळणार आहे.
*ठराव क्र.1:* वनहक्क क्षेत्रात ‘शस्त्रबंदी’ लागू
ग्रामसभेने सामूहिक वनहक्क क्षेत्रामध्ये कुऱ्हाड, गेलोल (गुलेल) आणि वाघूर (शिकारीचे साधन) यांसारखी वनसंपदेला आणि वन्यजीवांना हानी पोहोचवणारी साधने वापरण्यास संपूर्णतः बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण ठराव पारित केला.
*उद्देश:* जंगलाची बेकायदेशीर तोड थांबवणे, शिकारीला पायबंद घालणे आणि वन्यजीव अधिवासाचे रक्षण करणे.
*अंमलबजावणी:* या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर सामूहिक वनहक्क कायद्यानुसार कठोर दंड किंवा कारवाई करण्याची तरतूद ग्रामसभेने निश्चित केली आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी पेसा गाव वैतागवाडी ग्रामसभेची वनहक्क समिती आणि भविष्यात पुढे सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती (CFRMC) सक्रियपणे काम करणार आहे.
*ठराव क्र.2:* कुंभाडोंगर वणवा प्रतिबंधात्मक उपाययोजना
ग्रामसभेने कुंभाडोंगर या वनक्षेत्रात दरवर्षी उन्हाळ्यामध्ये लागणाऱ्या भीषण वणव्याच्या समस्येवर सखोल चर्चा करून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा ठराव घेतला.
*चर्चा:* वणव्यामुळे होणारे पर्यावरणाचे आणि वनसंपदेचे मोठे नुकसान, तसेच वन्यजीवांवरील धोका यावर ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली. अनेकदा मानवी निष्काळजीपणामुळे वणवे लागत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
*प्रतिबंधात्मक उपाययोजना:*
*फायर लाईन :* वणवा पसरू नये यासाठी संवेदनशील ठिकाणी ‘फायर लाईन’ तयार करणे.
*जागरूकता:* नागरिकांमध्ये वणव्याचे दुष्परिणाम आणि ते टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबद्दल जनजागृती मोहीम राबवणे.
*गस्त:* उन्हाळ्यापूर्वी आणि त्या दरम्यान वनक्षेत्रात ग्रामस्थांच्या स्वयंसेवक गटाकडून नियमित गस्त घालणे.
*जबाबदारी निश्चिती:* वणवा लावणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळाल्यास त्यांच्यावर ग्रामसभा स्तरावर सामूहिक कारवाई करणे.
वैतागवाडी ग्रामसभेचा हा ठराव सामूहिक वनहक्क कायद्यांतर्गत ग्रामस्थांना मिळालेल्या अधिकारांचा योग्य वापर करून वन आणि वन्यजीव संरक्षणाची भूमिका बळकट करणारा एक आदर्श निर्णय ठरला आहे.
यावेळी वन विभागाचे वनरक्षक रविंद्र राऊत,पेसा मोबिलायझर सुशीला पाटारा तसेच पेसा गाव वैतागवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.