Home latest News चेंबुरच्या नारायण गुरु महाविद्यालयातील

चेंबुरच्या नारायण गुरु महाविद्यालयातील

57

चेंबुरच्या नारायण गुरु महाविद्यालयातील

संस्थाध्यक्ष व प्राचार्यावर गुन्हे दाखल

अरुणकुमार करंदीकर
पनवेल शहर प्रतिनिधी
मो.क्र. 7715918136

पनवेल : मुंबईच्या चेंबुर मधील पी.एल. लोखंडे मार्गावर असलेल्या नारायण गुरु महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष एम आय दामोदरन व प्राचार्य रविंद्रन कर्थाडी यांना आता पुन्हा एकदा मुंबई सत्र न्यायालयाने एक महिन्याची शिक्षा व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. महाविद्यालयातील एससी एसटी ओबीसी प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून गैर मार्गाने मोठ्या प्रमाणात अवाजवी शुल्क वसुल केल्याबद्दल ह्या दोघांवर अॅट्राॅसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. न्यायमूर्ती शरयु सहारे यांनी ह्या दोघांना सदर गुन्ह्यात शिक्षा दिली होती.

सदर महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अवाजवी शुल्क वसुल केल्याबद्दल तेथील प्राध्यापक अनंत पिराजी कदम यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार 28 फेब्रुवारी 2012 रोजी देवनार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले होता. त्यावेळी 6 मार्च 2013 रोजी संस्थाध्यक्ष व प्राचार्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यांचा निकाल 29 आॅक्टोबर 2025 रोजी लागला . प्राध्यापक अनंत कदम हे महाविद्यालयात असतानाही त्यांनी शैक्षणिक संस्थेच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे धाडस दाखवले. एवढेच नव्हे तर, त्यांनी सदर प्रकरणाचा पाठपुरावा करून स्वतः न्यायालयात बाजू मांडली. त्यानुसार संस्थाध्यक्ष व प्राचार्याला शिक्षा ठोठावली. त्यामुळे प्रा. अनंत कदम यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

नारायण गुरु महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थाध्यक्ष आणि वरिष्ठ प्राध्यापिका हे परस्पर संगनमताने जाणिवपूर्वक मागासवर्गीय मराठी विद्यार्थ्यांकडून सदर महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशावेळी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा कैक पटीने जास्त शुल्क आकारून विद्यार्थी व पालकांचे आर्थिक शोषण करीत होते. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकार, विद्यापीठ अनुदान आयोग यांच्याकडून आलेला निधी संस्थाचालक, एम आय दामोदरन , रविंद्रन कर्थाडी प्राचार्य आणि वरिष्ठ प्राध्यापिका जयश्री व्यंकटाचलम हे सर्वजण मिळून हडप करत होते. त्याचप्रमाणे ह्या तिघांनी विद्यार्थ्यांकडून पैसे कमावण्यासाठी आणखी एक शक्कल लढवली होती. बारावी उत्तीर्ण विद्यार्थी जे प्रथम वर्ष बी काॅम साठी नियमानुसार मेरीट लिस्ट मध्ये पात्र आहेत. अशा विद्यार्थ्यांकडून अर्हता प्रमाणपत्राच्या गोंडस नावाखाली विद्यार्थ्यांना नको असलेला व त्यांची इच्छा नसलेला विषय जबरदस्तीने घ्यायची सक्ती करुन त्यांच्या कडून पैसे उकळत असत . त्याच महाविद्यालयात प्राध्यापक अनंत कदम 2002 पासुन सेवेत आहेत. त्यांना हा सर्व प्रकार आवडत नव्हता . त्यामुळे त्यांनी दरवर्षी ह्या विरोधात महाविद्यालय प्रशासनातील सर्वांना विद्यार्थ्यांकडून
नियमबाह्य पैसे घेऊन नये अशी विनंती करायचे. पण वारंवार उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना गप्प बसविले जात होते.

सदर महाविद्यालयाच्या परिसरात मराठवाडा औरंगाबाद विद्यापीठाच्या 1978 च्या नामांतर लढ्यातील अत्याचारग्रस्त, पिडित बौध्द आंबेडकरी समाजातील लोक राहतात. बौध्द समाजाचे विद्यार्थी नारायण गुरु हे महाविद्यालय जवळ असल्याने येथे प्रवेश घेत असतात. येथील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या विद्यार्थी वर्गातील पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. यामुळे प्राध्यापक अनंत कदम यांना वाईट वाटायचे म्हणून त्यांनी विद्यापीठ स्तरावर ह्या विरोधात आवाज उठवला. याच कारणामुळे विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारचे कोणतेही शुल्क आकारु नये. त्यांच्या गुणपत्रिका अडवून ठेवू नये. असे आदेश विद्यापीठाने नारायण गुरु महाविद्यालयाला दिले होते. सदरील सर्व बाबींचा आकस मनात ठेऊन महाविद्यालयातील भ्रष्टाचारी त्रयींनी प्राध्यापक अनंत कदम यांचा विविध मार्गाने छळ करुन त्यांच्यावर जातीगत अत्याचार करण्यास सुरुवात केली. उच्चपदस्थांच्या अन्याय अत्याचाराला न घाबरता प्राध्यापक अनंत कदम यांनी निर्भीडपणे गुन्हा नोंद करुन संस्थाध्यक्ष व प्राचार्याला तुरुंगवासाची शिक्षा व दंड आकारण्यापर्यंत केस लढवुन, आरोपींच्या धमक्यांना व आमिषाला बळी न पडता गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंत प्रकरण लावून धरले आणि गुन्हेगारांना शिक्षा देऊ केली.

याबद्दल मुंबईतील शिक्षण क्षेत्रात हा विषय चर्चिला जात आहे. प्राध्यापक अनंत कदम हे तिथेच नोकरी करुन आपल्या मागासवर्गीय गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी लढा उभारुन त्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आंबेडकरवाद हा नुसता न सांगता प्रत्यक्ष कसा अमलात आणला जातो . याचं हे एक मुर्तीमंत उदाहरण ठरले आहे. चांगल्या वरिष्ठ अशा मोठ्या पदावर पोहोचल्यानंतर समाजाला विसरण्याच्या काळात प्राध्यापक अनंत कदम यांनी समाजातील विविध क्षेत्रातील अधिका-यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. जिथे आहात तेथील आपल्या लोकांवर होणारा अत्याचार थांबविण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेला मंत्र विसरू नका. असा एक संदेश प्राध्यापक अनंत कदम यांनी समाजासमोर ठेवला आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व संस्था, संघटनांनी त्यांचे अभिनंदन करुन कौतुक केले आहे.