Home latest News शेकाप ने अलिबागच्या सर्वांगीण विकासाला अडथळा आणला:- सतिश धारप यांचा आरोप

शेकाप ने अलिबागच्या सर्वांगीण विकासाला अडथळा आणला:- सतिश धारप यांचा आरोप

82

शेकाप ने अलिबागच्या सर्वांगीण विकासाला अडथळा आणला:- सतिश धारप यांचा आरोप

अँड .रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
४२०३२५९९३

अलिबाग:- अलिबाग नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना जोर आला असून, सत्ताधारी शेकापवर नगर विकासाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने तीव्र टीका केली आहे. कोकण प्रदेशाचे भाजप संघटक सतीश धारप यांनी आयोजित पत्रकार परिषदेत शेकापच्या कार्यकाळातील अपयशांची यादी मांडत अलिबागच्या सर्वांगीण विकासाला जाणूनबुजून अडथळा आणल्याचा आरोप केला.

सतीश धारप म्हणाले की, “अलिबाग शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यात शेकाप पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. एकाच घराण्याने वारंवार सत्ता राखून अलिबागकरांच्या प्रगतीला ब्रेक लावण्याचे काम केले. शहराला व्यापक विकास हवा होता, परंतु सत्ताधाऱ्यांनी त्या दिशेने एकही ठोस पाऊल उचलले नाही.”

धारप यांनी अलिबाग शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा उपस्थित करत, शहराच्या भविष्यासाठी हद्द वाढ ही अत्यावश्यक असूनही शेकापने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याची टीका केली.
ते म्हणाले, “अलिबागचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता हद्दवाढ अपरिहार्य आहे. परंतु सत्ताधाऱ्यांनी त्यासाठी कोणतीही प्रक्रिया राबवली नाही. भाजपला सत्ता दिल्यास हद्दवाढीची प्रक्रिया प्राधान्याने राबवली जाईल.”
शहराच्या भुयारी गटार योजनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही धारप यांनी केला.
“तांत्रिक कारणांचा आधार घेऊन गटार योजना मुद्दाम रखडवली. शहराच्या मूलभूत सुविधांकडे शेकापनं संपूर्णपणे पाठ फिरवली आहे,” असे ते म्हणाले.

अलिबाग शहरातील पाणीपुरवठ्याबाबतही असंतोष व्यक्त करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
“पुरेशा पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे. उपलब्ध स्रोत असूनही योग्य नियोजन न केल्यामुळे नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शेकापच्या कारभारात पाणीपुरवठा व्यवस्थाही ढासळली आहे,” असा आरोप त्यांनी केला.
भाजपच्या विजयासह सर्वांगीण विकासाची ग्वाही त्यांनी दिली. अलिबाग शहराचा नियोजनबद्ध आणि आधुनिक विकास करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे.
“नागरिकांनी आम्हाला संधी दिल्यास – हद्दवाढ, भुयारी गटार, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांवर तातडीने काम सुरू केले जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी भाजप नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आस्वाद पाटील, जिल्हा सरचिटणीस अँड.महेश मोहिते, गिरीश तुळपुळे, महिला आघाडीचे अध्यक्ष चित्रा पाटील, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तनुजा पेरेकर, शहराध्यक्ष अंकित बंगेरा आदी उपस्थित होते.
अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असताना धारप यांच्या आरोपांमुळे शेकाप–भाजप संघर्ष अधिक चुरशीचा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.