Home latest News राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत पालघरचा कुमारी संघ विजेता — पालघरचा ऐतिहासिक बहारदार...

राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत पालघरचा कुमारी संघ विजेता — पालघरचा ऐतिहासिक बहारदार विजय

94

राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत पालघरचा कुमारी संघ विजेता — पालघरचा ऐतिहासिक बहारदार विजय

भरत पुंजारा 

पालघर तालुका प्रतिनिधी 

मो.९९२३८२४४०७

५२वी कुमार–कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पालघर जिल्ह्याच्या कुमारी संघाने अप्रतिम कामगिरीची नोंद करत राज्य विजेतेपदावर ठसठशीत शिक्का मोर्तब केला आहे. अंतिम सामन्यात पालघरच्या कुमारी संघाने पुणे पिंपरी-चिंचवड संघावर तब्बल १० गुणांनी मात देत दणदणीत विजय संपादन केला. तर पालघरच्या कुमार गटाने अत्यंत उत्कृष्ट खेळ करत उपविजेतेपदावर समाधान मानले. दोन्ही संघांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ही राज्यस्तरीय स्पर्धा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बोपखेल येथे २५ ते २९ नोव्हेंबरदरम्यान पार पडली. स्पर्धेत राज्यातील विविध जिल्हा असोसिएशनचे एकूण ३१ संघ सहभागी झाले होते. कुमारी गटात पालघरच्या खेळाडूंनी सलग विजयाची परंपरा कायम ठेवत ठाणे, हिंगोली, नंदुरबार, रायगड यांचा पराभव केला आणि उपांत्य फेरीत सांगलीला नामोहरम करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

कर्णधार ग्रीष्मा वनारसेचे नेतृत्व आणि संघाचा उत्कृष्ट समन्वय

कर्णधार ग्रीष्मा वनारसे हिच्या नेतृत्वाखालील कुमारी संघाने अत्यंत अचूक समन्वय, रणनीती, चिकाटी आणि आक्रमक खेळाच्या बळावर स्पर्धेवर वर्चस्व राखले. प्रत्येकी खेळाडूने संघभावनेने लढत उत्तुंग कामगिरीचा ठसा उमटविला.

विजयी पालघर कुमारी संघातील खेळाडू:

ग्रीष्मा वनारसे (कर्णधार), पायल बेलकर, सुजाता लहांगे, प्रिन्सिया मानकर, अक्षया पाटील, हनी सोलामुट्टू, आरती महाकाल, जागृती मोर, संजना भोईर, काजल भोईर, अंजली यादव, साक्षी शर्मा, किमया धवन आणि जानवी पाटील.

कुमार गटाकडूनही उत्तम कामगिरी — ध्रुव डोंगरेचा महाराष्ट्र संघात समावेश

कुमार गटानेही संघभावना आणि जिद्दीच्या जोरावर स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे पालघरच्या ध्रुव डोंगरे याची महाराष्ट्र संघात निवड झाल्याची माहिती मिळताच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

यशामागे पालघर कबड्डी संघटनेचा मोलाचा वाटा

या विजयामध्ये पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण राऊत, उपाध्यक्ष वल्केश राऊत, सचिव मनोज ठाकूर, तसेच प्रशिक्षक आरती यादव आणि व्यवस्थापक दिक्षा परब यांच्या अथक परिश्रम व नियोजनाचा मोलाचा वाटा असल्याचे बोलले जात आहे.

पालघर जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा हा विजय असून, जिल्ह्यात सध्या आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी राष्ट्रीय सामन्यांसाठी पालघरच्या खेळाडूंनी तयारी सुरू केली असून त्यांच्याकडून आणखी मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.