वाणगाव चंद्रनगर येथे महिला मेळावा, पोषण महा समारोप व बालक-पालक मेळावा उत्साहात संपन्न

अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
7798185755
वाणगाव :- जिल्हा महिला व बालकल्याण विभाग पालघर अंतर्गत एकात्मिक बालविकास प्रकल्प डहाणू यांच्या वाणगाव २ विभागामार्फत महिला मेळावा, पोषण महा समारोप समारोह व बालक-पालक मेळावा हा कार्यक्रम वनई/चंद्रनगर ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळा चंद्रनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला सुमारे 150 ते 175 महिला व बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद वनई/चंद्रनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती कामिनी जनाठे यांनी भूषविले. यावेळी उपसरपंच श्री. अशोक तल्हा, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती पार्वती भावर, श्रीमती नीलम गोरखना, बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. सतीश पोळसर, मुख्याध्यापक श्री. जाधव सर, शिक्षक श्री. पाटील सर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री. संजय राजपूत, अॅड. श्री विराज गडग, डॉक्टर श्रीम. मनिषा वडवी, आरोग्य सहाय्यिका श्रीम. मंगला पाटील, ग्रामविकास अधिकारी श्री. मिलिंद गायकवाड तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीम. मनीषा हातकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व पद्मश्री अनुताई वाघ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
या वेळी Adv. विराज गडग यांनी महिलांच्या हक्क व कायद्याबाबत मार्गदर्शन केले, तर डॉक्टर मनिषा वडवी यांनी महिलांच्या आरोग्याविषयी उपयुक्त माहिती दिली. अंगणवाडीतील बालकांनी गाणी, गोष्टी आणि वेशभूषा सादरीकरण करून उपस्थितांचे मनोरंजन केले. तसेच अंगणवाडी सेविकांनी “माझं बाळ माझी जबाबदारी” हे पथनाट्य सादर केले.
किशोरवयीन मुला-मुलींनी रांगोळी व पोस्टर स्पर्धेत सहभाग घेतला. महिला व अंगणवाडी ताईंनी पौष्टिक रेसिपींचे प्रदर्शन मांडले. बालक-पालक मेळाव्याच्या निमित्ताने सुमारे 20 हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले होते, ज्यामध्ये माझ्याशी बोला, बाल विकास उपक्रम, आहार व बाळ कोपरा, स्वच्छता, सापशिडी खेळ, मायेचा घास, टिकली लावणे आणि माझे बाळ माझी जबाबदारी असे विविध उपक्रम सादर करण्यात आले.
मेंदूचे जाळे या खेळावर आधारित उपक्रमात अधिकारी व मान्यवरांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी विविध स्पर्धांमध्ये विजेत्यांना प्रमाणपत्रे व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
शेवटी सर्व उपस्थितांनी “पोषण प्रतिज्ञा” घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.








