बनावट नोटांप्रकरणी अटकेत असणाऱ्या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:– बनावट नोटांप्रकरणी अटकेत असणाऱ्या भूषण पतंगे याचा मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१७) घडली. पोलीस कोठडीत असताना मारहाण केल्यामुळेच भूषण पतंगे याचीं तब्बेत बिघडल्याचा आरोप पतंगे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर आरोपीला फिट येण्याचा आजार होता. या आजारावर उपचार सुरू असताना पतंगे याचा मृत्यू झाल्याची माहिती अलिबाग पोलिसांनी दिली आहे.
३ ऑक्टोबर रोजी अलिबाग पोलिसांनी भूषण पतंगेच्या घरातून पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचा लाखो रुपयांचासाठा जप्त केला होता. यानंतर न्यायालयाने पतंगे याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडीत असताना पतंगे याला फिट आल्याने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. येथून पुढील उपचाराचारासाठी पतंगे याला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले होते. पतंगे याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान शुक्रवारी पतंगे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, भूषणच्या नातेवाईकांनी त्याला चौकशीदरम्यान पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळेच तो दगावल्याचा आरोप केला आहे. भूषणच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.
………………………
भूषण पतंगेला याअधी २०१९ मध्ये श्रीवर्धन येथील दरोडा प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याला वैद्यकीय तपासणीत फीटचा आजार असल्याचे निदर्शनास आल्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यामुळे आजाराची पार्श्वभूमी आधीपासूनच आहे. यावेळीसुद्धा चौकशीदरम्यान त्याची तब्येत बिघडल्याने त्याला आधी जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
: किशोर साळे,
पोलीस निरीक्षक, अलिबाग पोलीस ठाणे
……………….








