सूत्रकार बेंडगपाडा येथे आमदार विनोद निकोले यांची पाहणी — दिवाळीनंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात

अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
7798185755
तलासरी :- तलासरी तालुक्यातील सूत्रकार बेंडगपाडा येथील नागरिक आणि विद्यार्थ्यांना अनेक वर्षांपासून रस्त्याच्या अभावामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्याच्या काळात या भागातील नागरिकांना ये-जा करणे कठीण बनत होते.
या विषयाची विविध वृत्पात्रांमध्ये बातम्या आल्या आणि पालघर समाचार या न्यूज चॅनलवर प्रसिद्ध झाल्यानंतर डहाणूचे विद्यमान आमदार विनोद निकोले यांनी तत्काळ दखल घेत बेंडगपाडा गावाला भेट दिली.
दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी आमदार निकोले यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन रस्त्याची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना आश्वासन दिले की, दिवाळीनंतर या रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल.
या आश्वासनामुळे बेंडगपाडा परिसरातील विशेषतः कालू नदीच्या पूर्वेकडील भागात राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही रस्त्याच्या समस्येने त्रस्त होतो, आमचे म्हणणे कोणी ऐकून घेत नव्हते. मात्र आमदार विनोद निकोले यांनी आमच्या गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि काम सुरू करण्याचे आश्वासन दिले, याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.”
ग्रामस्थांच्या या समस्येवर तातडीने प्रतिसाद देत आमदार निकोले यांनी दाखवलेली तत्परता गावकऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरली असून, दिवाळीनंतर रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.








